शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे दसरा मेळावा होणार आहे. बाकीच्यांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न असून लोकशाहीमध्ये चांगले तोडगे निघत असतात. पण एक मैदान, एक नेता ही अनेक वर्षांची परंपरा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांनी चालवली असल्याची भूमिका शिवसेना आमदार आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितली आहे. एकीकडे शिंदे गटाकडून देखील दसरा मेळावासाठी परवानगी मागण्यात आली आहे. त्यामुळे दसरा मेळावा वादाचा विषय ठरत आहे.
ADVERTISEMENT
घरका भुला कधीना कधी परत येईल, नीलम गोर्हे यांना विश्वास
पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नीलम गोऱ्हे गेल्या होत्या. राज्यावरील संकट दूर कर अशी प्रार्थना आपण गणरायाकडे केली, असं त्या म्हणाल्या. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मागील काही काळात शिवसेनेत अनेक घटना घडल्या आहेत. पण शिवसेनेनं आजवर प्रत्येक संकटामधून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली आहे. त्यामुळे भगवद्गीतेत सांगितल आहे की, जे कोणी गेलेले आहे त्याचं दुःख व्यक्त करत बसू नका, त्याच भूमिकेत आम्ही आहोत, असं त्या म्हणाल्या.
कधी ना कधी घर का भुला हुआ, परत येईल अस मला स्वतःला वाटत आहे, असा विश्वास नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. सध्या ज्या राजकीय टीका टिप्पणी सुरू आहे त्यावर त्या म्हणाल्या की, सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्यातून लोकांना मूळ प्रश्नापासून दूर ठेवण्याचं काम सुरु आहे.
पक्ष्याच्या डोळ्याप्रमाणे आम्हाला फक्त शिवसेनाचा धनुष्यबाण दिसतो : नीलम गोऱ्हे
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत राज ठाकरे असणार आणि ते भाषण करणार असल्याची चर्चा आहे. यावर त्या म्हणाल्या की, आपल्याला दूरध्वनीवर आवाज येतो त्यावेळी आसपासचा गोंधळ ऐकू येत असतो. आपण त्या गोंधळाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे पक्षाच्या डोळ्या प्रमाणे आम्हाला फक्त शिवसेनेचा धनुष्यबाण दिसत असल्याचे नीलम गोऱ्हे या म्हणल्या. दर्शनाच्यावेळी नीलम गोऱ्हे यांच्यासह मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. दरम्यान नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलणं टाळलं.
ADVERTISEMENT