ठाणे : ही हास्यास्पद बाब आहे. मी दोनवेळचा खासदार आहे. कुठं बसायचं, कुठं नाही ते कळतं. फोटोतील ऑफिस हे आमच्या घरातील खाजगी ऑफिस आहे, मी ज्या खुर्चीवर बसलो ती खुर्ची माझी आहे. पण शिंदे साहेबही या खुर्चीचा वापर करतात, असं म्हणतं खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘सुपर सीएम’च्या व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे?
श्रीकांत शिंदे म्हणाले, ही हास्यास्पद बाब असून विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते अशा प्रकारे काही ना काही मुद्दे उचलत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सक्षम आहेत. ते 18-18 तास काम करतात. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सुपर सीएम म्हणून काम करण्याची कोणालाही काहीही गरज नाही.
तसेच जो फोटो व्हायरल केला आहे, तो आमच्या निवासस्थानचा आहे. ठाण्याच्या लुईसवाडीच्या घरातील ते ऑफिस आहे. मी ज्या खुर्चीवर बसलो ती खुर्ची माझी आहे. मात्र शिंदे साहेबही या खुर्चीचा वापर करतात. ते मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून या कार्यालयाचा वापर करतात. हजारो लोक इथे येतात. इथून जनतेचे प्रश्न सोडवतात.
हे घर शासकीय घर नाही. मी वर्षा बंगल्यावर अथवा मंत्रालयात जावून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो,असं झालेलं नाही. हे बदनाम करण्याचे काम होत आहे. शिवाय जो बोर्ड आहे, तो हलता बोर्ड आहे, शिंदे साहेबांची एक व्हिडीओ कॉन्फरन्स असल्याने तो इथे ठेवण्यात आला होता. मी देखील दोनवेळचा खासदार आहे. त्यामुळे मला कळत कुठे बसायचं कुठे नाही.
आधीचे मुख्यमंत्री एका ठिकाणी बसून काम करायचे. शिंदे साहेब वेगवेगळ्या ठिकाणी बसून काम करत असतात. त्यामुळे आधीच्या मुख्यमंत्र्यांसारखा हा अनुभव नाही, असे म्हणतं श्रीकांत शिंदे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही खोचक टोला लगावला.
नेमके काय घडले?
आज राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक फोटो ट्वीट केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना हा फोटो अतिशय जबाबदार व्यक्तीने पाठवला. वरपे यांनी शेअर केलेल्या या फोटोत श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसल्याचं दिसून येते. ‘महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री’ असा फलकही त्यामागे आहे. तसंच या फलकाच्या वरच्या बाजूला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही आहे. या खुर्चीत बसून श्रीकांत शिंदे लोकांशी चर्चा करत आहेत असं दिसतं आहे.
वरपे यांनी या फोटोसोबत ” खासदार श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर? असे सवाल विचारणाऱ्या कॅप्शनच्या मदतीने खोचक शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT