काळाजाचा ठाव घेणारा सूमधूर आवाज निमाला. आपल्या स्वराने हजारो गाणी अजरामर करणारा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केकेचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.
ADVERTISEMENT
कोलकातामध्ये आयोजित लाईव्ह कॉन्सर्टनंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर रुग्णालयात नेईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली.
कृष्णकुमार कुन्नथ याचे कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. कॉन्सर्टनंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि तो खाली पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वयाच्या ५३व्या वर्षी केकेनं अखेरचा श्वास घेतला.
प्राथमिक माहितीनुसार केकेचं निधन ह्रदयविकाराच्या धक्क्याने झालं. मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकेल. केके दोन दिवसांसाठी कोलकातात आला होता. विवेकानंद कॉलेजमध्ये त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्याचा हा परफॉर्मन्स अखेरचा ठरला.
केकेच्या निधनाने देश हळहळला
केकेच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. संगीत क्षेत्रातील गायक-संगीतकारांबरोबरच कलाकारांनीही केकेच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. “मी थक्क आहे. मला ही माहिती माझ्या मॅनेजरकडून मिळालीये. माझा मॅनेजर केकेच्या मॅनेजरचा मित्र आहे,” असं गायक जावेद अली म्हणाले.
“आधी लता मंगेशकर गेल्या. नंतर बप्पी दा गेले आणि आता केके. संगीत क्षेत्राला कुणाची नजर लागलीये माहिती नाही. ५३ हे काही जाण्याचं वय नव्हतं. मला धक्काच बसला आहे. खूप दुःख झालंय,” अशा शब्दात गायक उदित नारायण यांनी केकेच्या निधनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
केकेची ह्रदयाचा ठाव घेणारी गाणी
केकेने असंख्य गाणी गायिली. त्यात ‘तडप तडप के इस दिल से’ पासून ते इट्स टाईम टू डिस्कोपर्यंत गाणी गायिली. ‘खुदा जाने’, ‘जिंदगी दो पल की’, ‘जरा सा’, ‘तू ही मेरी शब है’, ‘आँखो में तेरी अजब सी’, ‘तू जो मिला’, ‘आशांए’, ‘मैं तेरा धडकन तेरी’ ही आणि इतर गाणी अजरामर ठरली.
करण जोहर, कुमार सानू, वरुण ग्रोव्हर, बोमन ईराणीनेही केकेच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. आर. माधवन, अक्षय कुमार, शंकर महादेवन, अभिषेक बच्चन, श्रेया घोषाल, बाबुल सुप्रियो, फरहान अख्तर, ज्युबिन नौटियाल, राहुल वैद्य, प्रीतम, विशाल ददलानीनेही ट्विट करत आपल्या दुःख व्यक्त केले.
राजकीय वर्तुळातूनही व्यक्त करण्यात आला शोक
केकेच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. “केकेच्या निधनामुळे दुःखी आहे. त्यांच्या गाण्यातून वेगवेगळ्या भावना व्यक्त होतात. प्रत्येक वयाच्या लोकांशी त्यांचं कनेक्शन जुळून येतं. त्यांच्या गाण्यांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत,” असं मोदींनी म्हटलं आहे.
मोदींबरोबर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह राजकीय नेत्यांही केकेच्या निधनावर हळहळ व्यक्त केली.
केके बॉलिवूडमधील नावाजलेल्या महत्त्वाच्या गायकांपैकी एक होता. केकेने अनेक भाषांमध्ये गाणी गायिली. ९०च्या दशकात ‘यारो’ गाण्याने सर्वांची मने जिंकणाऱ्या केकेने हजारो गाण्यांना आपला स्वर दिला.
ADVERTISEMENT