– मिथीलेश गुप्ता, कल्याण प्रतिनीधी
ADVERTISEMENT
राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरुच आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिल्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राचा कणा मानली जाणारी एसटी सेवा अजुनही ठप्प आहे. काही डेपोंमध्ये कर्मचारी कामावर परतले असले तरीही बहुतांश भागात एसटी सेवा बंदच आहे. एकीकडे सरकार आणि कामगार संघटना आपापल्या भूमिकेवरुन माघार घेण्याच्या तयारीत नसताना कर्मचाऱ्यांवर आता बिकट परिस्थिती यायला लागली आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी अनेक एसटी कर्मचारी मिळेल ते काम करुन आपलं घर चालवत आहेत. कल्याण आगारात काम करणाऱ्या प्रमोद चिमणे यांनी आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरता भाजीपाला विकण्यास सुरुवात केली आहे.
कल्याण हे वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचं जंक्शन मानलं जातं. कल्याण शहराशेजारी असलेल्या विठ्ठलवाडीमध्ये एक एसटी डेपो आहे. परंतू संपात सर्व कर्मचारी सहभागी झाल्यामुळे सरकारने पगार थांबवला आहे. विठ्ठलवाडी बस डेपोत चालक वाहक हे दोन्ही काम करणारे ३३ वर्षीय प्रमोद चिमणे हे संपात सहभागी आहेत. डोंबिवलीजवळच्या निळजे गावात प्रमोद आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. प्रमोद यांचे आई-वडील गावात राहतात. एसटीत कामाला असताना प्रमोद यांना महिन्याकाठी १२ हजार रुपये मिळायचे. परंतू हा पगार बंद झाल्यामुळे भाजीपाला विकून दिवसाकाठी प्रमोद यांना २०० ते ३०० रुपये सुटतात.
मुंबई तकने प्रमोद चिकणे यांच्याशी संवाद साधून त्यांची भावना जाणून घेतली. आई-वडिल वृद्ध आहेत, मुलांच्या शिक्षणाची मोठी जबाबदारी आहे. १२ हजार पगारातून ५ हजार रुपये खोलीचं भाडं जातं. काही दिवसांपूर्वी मी हातगाडी लावून धंदा करायला सुरुवात केली. मात्र पालिका कर्मचारी आणि स्थानिक भाजीपाला वाले इथे विक्री करु देत नाहीत. म्हणून आता जमिनीवर चादर टाकून त्यावर भाजीपाला विकायला सुरुवात केल्याचं प्रमोद यांनी सांगितलं. आपल्यासारखेच ३० ते ३५ कर्मचारी अशाच पद्धतीने काम करत असून, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन आणि संप सुरुच राहिल अशी माहिती प्रमोद यांनी दिली.
ADVERTISEMENT