नांदेड: माजी मुख्यमत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील बंगल्यावर दगडफेक करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. दोन व्यक्तींमधील किरकोळ वादावरुन ही दगडफेक करण्यात आली असल्याचं समजतं आहे. दरम्यान, या प्रकरणी नांदेड पोलीस दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शिवाजी नगर परिसरात अशोक चव्हाण यांचा खासगी मालकीचा बंगला आहे. याच बंगल्यासमोर दोन भिकारी आणि मनोरुग्ण असलेल्या महिलांचा कोणत्या तरी गोष्टीवरुन वाद सुरु होता. एवढंच नव्हे तर त्यांच्यात मारहाण देखील सुरु झाली. त्यामुळे बंगल्यावर तैनात असलेले सुरक्षा रक्षक हे दोघींमधील हाणामारी सोडविण्यासाठी गेले होते.
पण दोघी महिला या भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सुरक्षा रक्षकांवरच धावून गेल्या. एवढंच नव्हे तर त्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक देखील केली. तसंच त्यांच्या केबिनवर देखील दगडफेक करण्यात आली.
दरम्यान, या दगडफेकीत केबिनच्या अनेक काचा देखील फुटल्या आहेत. ही केबिन अशोक चव्हाणांच्या बंगल्याच्या अगदी बाहेरच आहे. त्यामुळे या प्रकरणी माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोवर दोन्ही महिला तिथून फरार झाल्या होत्या. त्यामुळे सध्या पोलीस त्या दोन्ही महिलांचा शोध घेत आहे.
अशोक चव्हाण यांच्या बंगल्याच्या दिशेने महिलांनी केलेली दगडफेक ही नेमकी कोणत्या उद्देशाने केली होती याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत.
Kirit Somayia यांच्या ताफ्यावर वाशिममध्ये दगडफेक, गाडीवर शाई फेकली; शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप
सध्या राज्यात वेगवेगळ्या विषयावरुन राजकारण सुरु आहे. अशावेळी एखादी छोटी घटना देखील मोठं स्वरुप धारण करु शकते. त्यामुळेच अशोक चव्हाण यांच्या बंगल्याच्या जवळ झालेल्या दगडफेकी प्रकरणी तात्काळ पोलिसांनी शोधकार्य सुरु केलं आहे. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या महिला जोपर्यंत पोलिसांच्या हाती लागत नाही तोवर ही दगडफेक का करण्यात आली होती याबाबतची नेमकी माहिती मात्र समजू शकणार नाही.
ADVERTISEMENT