बारामतीध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने सात दिवसांच्या कडक लॉकडाउनची घोषणा केली आहे. मेडीकल आणि दवाखाने यांचा अपवाद वगळता सर्व दुकानं आणि आस्थापना या काळात बंद राहणार आहेत. या काळात रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात येईल असंही प्रशासनाने स्पष्ट केलंय.
ADVERTISEMENT
औरंगाबाद : जेव्हा न्यायालय सरकारच्या लॉकडाउन नियमांची पोलखोल करतं
पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचं संक्रमण वाढत चाललं आहे, ज्यात बारामती तालुका आघाडीवर आहे. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ज्यानंतर बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीला सर्व महत्वाचे अधिकारी, लोकप्रतिनीधी आणि व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी हजर होते. गेल्या वर्षभरात बारामतीमध्ये जेवढे कोरोना रुग्ण सापडले यंदा तेवढेच रुग्ण निव्वळ एका महिन्यात बारामती शहर आणि तालुक्यात सापडले आहेत.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देणं गरजेचं असून यावर उपाययोजना म्हणून ७ दिवस कडक लॉकडाउनचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असेही आदेश प्रांताधिकारी यांनी दिले आहेत. मेडीकल आणि दवाखाने याव्यतिरीक्त सर्व दुकानं बारामती शहरात बंद राहतील. महत्वाची गोष्ट म्हणजे किराणा मालाच्या दुकानांनाही यंदा अत्यावश्यक सेवेच्या यादीत टाकण्यात आलेलं नाही. फक्त दुधाच्या दुकानांना यातून मूभा देण्यात आली आहे. सकाळी सात ते ९ या काळात बारामतीत दुध विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. बारामती शहरात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने साडेतीनशे ते चारशे रुग्ण सापडत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT