एकनाथ शिंदेंची सुरक्षा : सुहास कांदे, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई तक

• 07:23 AM • 22 Jul 2022

बंडखोर आमदार सुहास कांदे आणि माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी आली, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यास उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता, असा दावा सुहास कांदे आणि शंभूराज देसाईंनी केला आहे. दरम्यान, शंभूराज देसाईंच्या आरोपांवर माजी गृह राज्यमंत्री […]

Mumbaitak
follow google news

बंडखोर आमदार सुहास कांदे आणि माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी आली, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यास उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता, असा दावा सुहास कांदे आणि शंभूराज देसाईंनी केला आहे. दरम्यान, शंभूराज देसाईंच्या आरोपांवर माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शंका उपस्थित केलीये.

हे वाचलं का?

“एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. किंबहुना त्यांना मारण्यासाठी ठाण्यात आणि मुंबईत आले. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो, एसआयडी, सीआयडी यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना याबद्दलचा रिपोर्ट दिला. त्यानंतरही त्यांची सुरक्षा वाढवली नाही. त्यांना झेड प्लस सुरक्षेची गरज होती. हिंदुत्व विरोधकांना सुरक्षा दिली गेली, पण हिंदुत्ववाद्यांना सुरक्षा दिली नाही. ती का दिली गेली नाही?,” असं सुहास कांदे म्हणाले.

एकना शिंदे यांच्या सुरक्षेवरून सुहास कांदेंनी उद्धव ठाकरेंवर काय केला आरोप?

“सकाळी साडेआठ वाजता शंभूराजेंना वर्षा बंगल्यावरून फोन आला की, एकनाथ शिंदेंना सुरक्षा द्यायची नाही. मग एकनाथ शिंदे यांना सुरक्षा का दिली गेली नाही हा प्रश्न माझा आदित्य ठाकरेंना आहे,” असा सवाल सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना केला.

‘एकनाथ शिंदे सुरक्षा दिली नाही’ : सुहास कांदेंच्या आरोपावर शंभूराज देसाई काय म्हणाले?

“तत्कालिन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माओवाद्यांचं एक पत्र आलं होतं. त्यांच्या जिवाला धोका असल्याचं, त्यांच्या कुटुंबाच्या जिवाला धोका असल्याचा स्पष्ट उल्लेख माओवाद्यांच्या पत्रात होता. हे पत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर ते गृह विभागातील अधिकाऱ्यांकडे गेलं होतं.

“त्याच काळात विधानसभेत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मी म्हणालो होतो की, या प्रकरणाची चौकशी विभागाकडून केली जातेय. त्याच्यामध्ये तथ्य आढळलं, तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल, असं मी सांगितलं होतं.”

“त्या पत्राची सत्यता पडताळली गेली. त्यात सकृतदर्शनी तथ्ये आढळले. मी तातडीने राज्याचे पोलीस महासंचालक, कायदा सुव्यवस्था अतिरिक्त पोलीस महासंचालक, एसआयडी आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मी मुंबईत बोलावली होती. ज्या दिवशी बैठक बोलावलेली होती, त्याच दिवशी सकाळी साडेआठ वाजता वर्षा बंगल्यावरून मला फोन आला. त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फोनवर होते. त्यांनी मला विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं आजच बैठक होणार आहे. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री म्हणाले की, अशा पद्धतीने सुरक्षा वाढवता येणार नाही,” असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.

एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेच्या निर्णयाबद्दल सतेज पाटलांचा खुलासा?

“शंभूराजे देसाई असो किंवा मी, याबद्दल निर्णय आम्ही घेत नाही. यासंदर्भातील निर्णय मुख्य सचिवांच्या अतंर्गत ही समिती असते. त्या पद्धतीने सुरक्षा दिली जाते. त्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नाही. ते विश्लेषण करून गरज वाटल्यास सुरक्षा देतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून अशा पद्धतीच्या सूचना गेल्या असतील असं मला वाटतं नाही. उलट गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून जास्तीची सुरक्षा देण्याचं काम पोलीस खातं करत असतं. या गोष्टीत काही तथ्य वाटत नाही,” असं म्हणत सतेज पाटील यांनी शंभूराज देसाई यांच्या आरोपांवर शंका उपस्थित केलीये.

    follow whatsapp