मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात जी याचिका ठाकरे सरकारविरोधात केली होती त्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. तसंच परमबीर सिंग यांना हायकोर्टात जाण्याचे निर्देशही दिले आहेत. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आहे, त्यासाठी तुम्ही आधी हायकोर्टात का गेला नाहीत? असं विचारत सुप्रीम कोर्टाने याचिकेवर सुनावणीसाठी नकार दिला आहे.
ADVERTISEMENT
परमबीर सिंग यांनी सुप्रिम कोर्टाकडे केली बदली रोखण्याची मागणी
२२ मार्चला परमबीर सिंग यांनी ठाकरे सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी मी जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे त्यामध्ये तथ्य आहे, मी काहीही खोटं बोललो नाही असं नमूद करण्यात आलं होतं. तसंच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती, बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती आणि हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे देण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली होती. मात्र या याचिकेवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. हे प्रकरण गंभीर आहे तुम्ही हायकोर्टात जावं असं स्पष्ट केलं आहे.
काय आहे रश्मी शुक्ला यांनी लिहिलेल्या पत्रात? वाचा सविस्तर..
सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे?
तुम्ही याचिकेमध्ये नमूद केलेलं प्रकरण अत्यंत गंभीर आहे, राज्याला हादरवून सोडणारं आहे. रश्मी शुक्ला यांनी केलेले आरोपही गंभीर आहेत. तुम्ही या संदर्भात आधीच हायकोर्टात का गेला नाहीत? दोन वर्षांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची बदली होणं ही बाब गंभीर आहे असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं. तसंच कलम ३२ अन्वये तुम्ही आधी हायकोर्टात जायला हवं होतं.
न्या. जे कौल म्हणाले की तुम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली हे मान्य मात्र तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत?
याबाबत मुकुल रोहतगी म्हणाले की हा विषय गंभीर आहे त्यामुळेच आम्ही पहिली दाद सर्वोच्च न्यायालयात मागितली.
न्या. कौल – मात्र तुम्ही आधी हायकोर्टात जाणं, तिथे दाद मागणं गरजेचं होतं.गृहमंत्री साहेब वाहिन्यांना सांगत आहेत की परमबीर सिंग यांची बदली ही अँडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर नाही असं सांगितलं होतं.
त्यानंतर वकील जी सदावर्ते यांनी सांगितलं की हे प्रकरण उच्च न्यायालयातच जायला हवं.
मुकुल रोहतगी यांनी अशीही काही उदाहरणं दिली ज्यामध्ये प्रकरण थेट सुप्रीम कोर्टातच गेलं होतं.
मात्र या बाजू ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुनावणी करण्यास नकार दिला.
सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने विचारलं की तुम्ही आधी उच्च न्यायालयात का गेला नाहीत? अनिल देशमुख यांच्यावर तुम्ही केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत.
मुकुल रोहतगी : हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्यानेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र पुढच्या काही मिनिटांमध्ये हायकोर्टात याचिका दाखल करतो. या प्रकरणात राज्य सरकार माझ्या अशीलाच्या विरोधात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सिंग यांना दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पदावरून हटवलं जाऊ शकत नाही. संपूर्ण देशावर परिणाम घडवणारं हे प्रकरण आहे. अँटेलिया स्फोटक प्रकरणाची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. एक आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बदल्यांच्या रॅकेटचा आरोप केला आहे. याकडेही रोहतगी यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.
कोर्टाने काय म्हटलं ?
हे प्रकरण गंभीर आहे. तुम्ही संबंधित खात्याला पक्षकार का केलं नाही ? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांना विचारला. हायकोर्टात जाण्याची संधी तुम्ही का सोडलीत? असाही प्रश्न सुप्रीम कोर्टाने केला. या प्रकरणावर उच्च न्यायालयाने सुनावणी करावी असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
ADVERTISEMENT