कोश्यारी, लोढा या अमराठी नेत्यांच्या विधानांना फडणवीसांची छत्रछाया : अंधारेंचा हल्लाबोल

मुंबई तक

• 02:21 PM • 30 Nov 2022

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. अशात आता नव्या विधानाची भर पडली आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी करत उद्धव ठाकरेंना व्हिलन ठरवलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. अशात आता नव्या विधानाची भर पडली आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी करत उद्धव ठाकरेंना व्हिलन ठरवलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, या विधानावरुन आता शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी थेट भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विट करत अंधारे म्हणाल्या, गेली काही महिने सातत्याने महापुरुषांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करत महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचा सपाटा भाजपने सुरू केला आहे.

विशेषतः कंबोज, राणा, सोमय्या, कोश्यारी, लोढा या अमराठी भाजप नेत्यांकडून महापुरुषांबद्दल अवमूल्यनात्मक वक्तव्य हा निव्वळ योगायोग नव्हे तर देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली सुरू असलेले हे पूर्वनियोजित षडयंत्र आहे. मोदींना रावण म्हटल्यावर अत्यंत तत्परतेने व्यक्त होणारे देवेंद्रजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असताना मात्र अळीमिळी करून बसतात हा त्याचा ढळढळीत पुरावा आहे, असही त्या म्हणाल्या.

मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?

364व्या शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड किल्ल्यावर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात मंगलप्रभात लोढा यांनी भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीची तुलना थेट औरंगजेबाशी करत एकनाथ शिंदेंच्या मार्गातील व्हिलन ठरवलं. तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी केली.

मंगलप्रभात लोढा एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल काय म्हणाले?

मंगलप्रभात लोढा शिवप्रताप दिन सोहळ्यात म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं, परंतु छत्रपती शिवराय स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून (शिवसेना, मविआ) बाहेर पडले”, असं विधान मंगलप्रभात लोढांनी केलं.

    follow whatsapp