दुबई: टी-20 विश्वचषकातील सामन्यात पाकिस्तानकडून टीम इंडियाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. भारत-पाकिस्तान हा सामना प्रत्येक देशावासियांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. त्यामुळे या सामन्यात भारत नेमकी कशी कामगिरी करतो याकडेच सगळ्यांचं लक्ष असतं.
ADVERTISEMENT
या हायव्होल्टज सामन्यात एका क्षणी उत्सुकता एवढी शिगेला पोहचली होती की, खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शाह हे स्वत: उठून चक्क नाचत असल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. पण काही जण त्यांना ट्रोलही करत आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची परिस्थिती फारच बिकट होती. त्यामुळे प्रत्येक रन हा मोलाचा होता. याच वेळी एका क्षणी शाहीन आफ्रिदीने केलेल्या ‘ओव्हर थ्रो’मुळे भारताला चार धावा अधिक मिळाला. हा क्षण खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे जय शाह यांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाही आणि त्यांनी थेट स्टँडमध्ये उभं राहूनच नाचण्यास सुरुवात केली.
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाला अपेक्षित अशा धावा होत नव्हत्या. त्याचवेळी शाहीन आफ्रिदीच्या 19व्या ओव्हरमध्ये भारतीय संघाला एक ओव्हर थ्रो मिळाला. हार्दिक पांड्याला आऊट करण्याच्या नादात शाहीनने केलेला थ्रो थेट सीमारेषेच्या पार गेला आणि त्यामुळेच भारतला एका बॉलमध्ये 5 रन्स मिळाले.
जेव्हा शाहीनने हा थ्रो केल्याचं दिसलं तेव्हा अवघ्या स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. कारण मोक्याच्या क्षणी भारताला 5 धावा मिळाल्या होत्या. संपूर्ण स्टेडियममध्ये सुरु असलेला जल्लोष यामुळे बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि त्यांच्याच शेजारी बसलेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हे एकाच वेळी उठून चक्क नाचत होते आणि हाच क्षण कॅमेऱ्यात देखील कैद झाला.
त्यामुळे आता सोशल मीडियावर त्यांचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दुसरीकडे त्यांच्या या व्हीडिओमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जात आहे.
भारताचं 151 धावांचं आव्हान पाकने सहज केलं पार
या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. पण भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे.
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा हा शून्यावर बाद झाला. शाहीन आफ्रिदीच्या एका शानदार चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. तर त्यानंतर अवघ्या 3 रन्सवर सलामीवीर केएल राहुल देखील बाद झाला. इथेच खऱ्या अर्थाने टीम इंडिया बॅकफूटवर गेली.
सुरुवातीलाच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने भारतीय संघाला दोन मोठे धक्के दिले. याशिवाय इतर पाकिस्तानी गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी करत भारतीय संघाला 20 ओव्हरमध्ये 151 धावांवरच रोखलं. यावेळी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 7 भारतीय फलंदाजांना माघारी पाठवलं. तर भारतीय संघाला पाकिस्तानची एकही विकेट घेता आली नाही.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून फक्त कर्णधार विराट कोहलीच अर्धशतक झळकावू शकला. त्याच्याशिवाय फक्त रिषभ पंतने 39 धावा केल्या. पण या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला फार धावा करता आल्याच नाही.
T20 WC, India vs Pakistan: सोशल मीडियात कोहलीचं प्रचंड कौतुक, पाकिस्तानी बोर्डाने देखील केलं ट्वीट
दुसरीकडे गोलंदाजीत तर भारतीय गोलंदाजांनी साफ म्हणजे साफ निराशा केली. पाकिस्तानसमोर 152 धावांचं आव्हान असताना देखील भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानचा एकही बळी मिळवता आला नाही.
ADVERTISEMENT