मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आता जवळपास २ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र याकाळात उद्धव ठाकरे यांची नवीन टीम तयार होताना दिसतं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले, ते बंड यशस्वी झाले. त्यांनी जाताना आमदार नेले, खासदार नेले, पक्षावरही ताबा मिळवण्यासाठी नियोजन केले जात आहे. आम्हीच खरी शिवसेना म्हणून शिंदेंनी घोषितही करुन टाकले आहे. या सगळ्यात त्यांनी थेट आव्हान दिले ते उद्धव ठाकरे यांना. पण हे सगळे असताना उद्धव ठाकरे यांनी उरलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन नवीन टीम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी सोडून गेलेल्या आमदार आणि खासदारांच्या मागे लागण्यापेक्षा सोबत असलेले तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, माजी नगरसेवक, इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. अशात जे दुसऱ्या पक्षातील आपल्याकडे येतील अशांचाही मोगावा घेऊन त्यांना शिवसेनेत घेतले आहे. जेव्हापासून शिंदेंनी बंड केले, तेव्हापासून अनेकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे, तर कोणी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे, तर कोणी पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे.
शिंदे गटातील १५ आमदार फोन करुन म्हणतात, “साहेब आमचं चुकलं… आम्हाला माफ करा”
शिवसेनेचे बंडखोर खासदार हेमंत पाटील यांना आस्मान दाखविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पक्षात घेतले. आधी शिवसेना नंतर भाजप, काँग्रेस आणि आता परत शिवसेना असा वानखेडेंचा प्रवास आहे. त्यानंतरच महत्त्वाचं नाव म्हणजे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर, याचे. ठाकरे यांनी संतोष टारफे आणि अजित मगर या बांगरांच्या दोन प्रतिस्पर्ध्यांना शिवसेनेत घेतले आहे. दोघांनीही ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले. संतोष टारफे हे काँग्रेसचे माजी आमदार तर वंचित आघाडीचे अजित मगरांची हिंगोलीत मोठी ताकद आहे.
जिथे कमी तिथे आम्ही म्हणतं सोलापुरात तरुणांची ताकद एकत्र करणाऱ्या शरद कोळींनीही शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. शिवाय प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनीही शिवबंधन बांधले आहे. सोलापूर जिल्ह्यात शहाजी बापू पाटील हे शिवसेनेचे आणि आता शिंदे गटात असलेले एकमेव आमदार आहेत आणि त्यांना आव्हान देण्यासाठी शरद कोळी आणि लक्ष्मण हाके यांच्या नावाचे कार्ड ठाकरे यांनी खेळले असल्याचे दिसून येतं आहे.
ईडी, सीबीआय आणि आमिष देऊन सरकारं पाडणं हेच सूत्र; मोदी सरकारबद्दल शरद पवार काय म्हणाले?
शिंदे गटातल्या खासदार भावना गवळींना ठाकरेंनी इमोश्नल विरोधी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. गवळींचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वेंनाच ठाकरेंनी पक्षात घेतले आहे. त्यामुळे याचा भावना गवळी यांच्या राजकारणावर फरक पडू शकतो हे नक्की. आंबेडकरी चळवळीचा महिला चेहरा आणि वक्ते सुषमा अंधारेंनी शिवसेनेचे शिवबंधन बांधून घेतले आहे. पक्षात येताच अंधारेंना उपनेतेपदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे पक्षाच्या नवउभारणीसाठी आणि महिला वक्ता म्हणून ठाकरेंना याचा चांगलाय फायदा होणार असल्याचे म्हटलं जातं आहे.
ठाकरेंना आतापर्यंत सगळ्यात मोठी ताकद मिळाली आहे ती म्हणजे संभाजी ब्रिगेडची. अनेक जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडची मतं निर्णायक आहेत. असे म्हटले जाते की एखादा उमेदवार जिंकून आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडची मते कमी असली तरी एखादा उमेदवार पाडण्याएवढी मतं संभाजी ब्रिगेडकडे जरुर आहेत. आता तिच मतं ठाकरेंच्या बाजूने फिरल्यामुळे सेनेला मोठा बूस्टर मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचे चांगलं नाव आहे. हातकणंगले हा त्यांचा पारंपारिक लोकसभा मतदार संघ आहे. याच मतदार संघातून निवडून आलेले धैर्यशिल माने हे सध्या शिंदे गटात आहेत आणि आता मानेंना खिंडीत गाठण्यासाठी शिवसेनेकडून राजू शेट्टींना प्रोत्साहन दिलं जाईल अशा चर्चा आहेत. ठाकरेंनी आदेश दिला तर आम्ही शेट्टींना पाठिंबा देऊ असे स्ठानिक शिवसैनिकही म्हणत आहेत. तर प्रस्ताव आल्यास विचार करु असे शेंट्टींचं म्हणणे असल्याच म्हटले जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी बंड होण्याआधीच शिवसेनेला युतीची ऑफर दिली होती. काही महिन्यांपूर्वी अकोल्यात पत्रकारांशी बोलताना आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीबद्दल भाष्य केले होते. यासंदर्भात आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्याचेही त्यांनी सांगितले होते.
आता या युतीची चर्चा पुढे सरकली तर राज्यभरात ठाकरे यांना मोठे यश मिळू शकते असे अंदाज राजकीय तज्ञांकडून वर्तविले जात आहेत. त्यामुळे ठाकरेंनी उभारलेली ही भिंत एकनाथ शिंदे यांना कसे काऊंटर करणार आणि त्याचा येत्या निवडणुकीत काय बदल दिसणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT