पुणे: टीईटी परीक्षा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला राज्य परीक्षा परिषदेचा माजी आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्याबाबत दिवसेंदिवस नवनवी आणि धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे. बुधवारी (22 डिसेंबर) संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास पुणे सायबर सेल (Pune Cyber cell) विभाग शिवाजीनगर येथे एका व्यक्तीने तब्बल10 लाख रुपयांची रोकड जमा केली. यावेळी त्यांनी त्याने आपल्या जवाबात असं म्हटलं आहे की, त्याला हे पैसे तुकाराम सुपे याने ह्यांनी ठेवण्यासाठी दिले होते.
ADVERTISEMENT
आतापर्यंत तुकाराम सुपेकडून कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अशावेळी एका दुसऱ्याच व्यक्तीकडून 10 लाख रुपये आता पोलिसांना जमा करण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांकडे एवढे पैसे जमा करणारा हा व्यक्ती नेमका कोण? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.
मात्र, या सगळ्या परीक्षा घोटाळ्यातून सुपे याने आतापर्यंत नेमकी किती कोटींची माया जमा केली आहे आणि ती नेमकी कुठे-कुठे दडवली आहे असाच प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.
राज्यात आरोग्य विभागातील भरती परीक्षा आणि म्हाडा परीक्षा पेपरफुटीची चर्चा सुरू असतानाच शिक्षक पात्रता परीक्षेतील मोठा घोटाळा समोर आला. राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी परीक्षा घेणाऱ्या जी.ए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रीतिश देशमुख याला हाताशी धरून टीईटी परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. याच प्रकरणी पुणे पोलिसांनी या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी तुकाराम सुपेला अटक केली आहे.
देश सोडून जाण्याच्या तयारीत असलेल्या सौरभ त्रिपाठीच्याही पोलिसांनी आवळल्या मुसक्या
दुसरीकडे बुधवारी (22 डिसेंबर) दुपारी पुण्याच्या सायबर सेल अधिकाऱ्यांनी देश सोडण्याच्या तयारीत असलेल्या सौरभ त्रिपाठिला थेट उत्तर प्रदेशच्या लखनौतून अटक केली असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.
टीईटी परीक्षा घोटाळा 2018 (TET Exam Scam) मध्ये सौरभ त्रिपाठीचा देखील संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळेच सौरभ देशाबाहेर पळून जात होता. ज्यासाठी त्याने व्हिसा देखील मिळवला होता.
याच त्रिपाठीने जी. ए. सॉफ्टवेयर कंपनीला टीईटी परीक्षेचं कंत्राट मिळवून दिल्याचं आता पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हाच त्रिपाठी विनर कंपनीचा संचालक देखील आहे. याच विनर कंपनीकडे सध्या यूपीतील शिक्षण विभागाच्या परीक्षा घेण्याचं कंत्राट आहे. त्यामुळे त्रिपाठीच्या अटकेनं अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या शासकीय भरती घोटाळ्यातील तपासाविषयी पुणे सायबर विभाग प्रमुख डीसीपी भाग्यश्री यांनी मुंबई Tak सोबत exclusive बातचीत करताना ही माहिती दिली आहे.
तुकाराम सुपेच्या घरातून काय-काय सापडलेलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाख 49 हजार 980 रोख रक्कम सापडली होती. त्याचबरोबर 5 ग्राम सोन्याचे नाणे, 5 लाख 50,000 हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केले होते. याशिवाय सुपेंनी त्याच्या मित्राला लाखो रुपये दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यामुळे अशा गैरप्रकारातून सुपेंनी किती माया जमा केली हे अजून समोर यायचं आहे.
टीईटी परीक्षा घोटाळा नेमका आहे तरी काय?
म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याच्यासह एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांची चौकशी करत असताना त्यांनी 2019-2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन निकाल बदलल्याचं सांगितलं.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या मदतीने हे केल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर पोलिसांनी 16 डिसेंबर रोजी तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांची सायबर सेल पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यांनी घोटाळ्याची कबुली दिली.
TET Exam Scam : पैसे, सोनं, एफडी… तुकाराम सुपेंच्या घरात सापडलं लाखो रुपयांचं घबाड!
परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर्स कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याला हाताशी धरून त्याच्यासोबत असलेल्या संतोष हरकळ व अंकुश हरकळ (रा. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) या एजंटच्या मदतीने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती मिळवल्याचं त्यांनी कबूल केलं.
परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत पास करण्याचं आश्वासन देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार ते 1 लाख अशा रकमा घेतल्या. यामाध्यमातून जवळपास 4 कोटी 20 लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे आरोपींनी आपआपसात वाटून घेतले.
यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रितीश देशमुख 1.25 कोटी, अभिषेक सावरीकर 1.25 कोटी घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांनी गुन्ह्याची कबुली देताना हे सांगितलं.
ADVERTISEMENT