आतापर्यंत सरकारी कामाचे अनेक अजब नमुने आपण सर्वांनी पाहिले असतील. परंतू जिवंत माणसाचं डेथ सर्टिफिकेट बनवून त्याच व्यक्तीला फोन करुन माहिती देण्याचा विचित्र कारभार कधी पाहिला आहे का? ठाण्यातील मानपाडा भागात राहणाऱ्या चंद्रशेखर देसाई यांना हा अनुभव आला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी चंद्रशेखर देसाई आपल्या घरी बसलेले असताना त्यांना ठाणे महापालिकेतून एक फोन आला. फोन करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने दिलेली माहिती ऐकून देसाई यांच्या पायाखालची वाळूच सरकली. महिला कर्मचाऱ्याने देसाई यांना नाव व पत्ता विचारला, महापालिकेकडे असलेल्या नोंदीशी पडताळणी केली आणि यानंतर “चंद्रशेखर देसाई यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांचं डेथ सर्टिफिकेट आलं आहे”, असं सांगितलं.
हे ऐकताच देसाई यांना धक्का बसला. मीच चंद्रशेखर देसाई बोलतोय तुम्ही असं कसं बोलताय? असं विचारलं असता समोरील कर्मचाऱ्याने आमच्याकडे अशीच नोंद झालेली आहे असं उत्तर दिलं. यानंतर कर्मचाऱ्याने देसाई यांना तुमचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता का? असा प्रश्न विचारला. ज्याला देसाई यांनी गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मला कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर आमच्या घरात कोणालाही कोरोनाची लागण झालेली नसल्याचं सांगितलं. या संभाषानंतर महिला कर्मचाऱ्याने फोन ठेवून दिला.
या फोननंतर चंद्रशेखर देसाई चांगलेच चिंतेत आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर वर्षभरानंतर आपल्या नावाची मृत्यू नोंद कशी झाली असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय. ही अनावधानाने झालेली चूक आहे की यामागे कोणती टोळी कार्यरत आहे असाही प्रश्न त्यांना पडलाय. देसाई हे घाटकोपरमधील एका शाळेत शिक्षक आहेत. ठाणे महापालिकेकडून या प्रकरणी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
ADVERTISEMENT