143 वर्षांपूर्वी मोरबीच्या राजाने बनवला होता केबल ब्रिज; जाणून घ्या काळ बनलेल्या मोरबी पुलाचा इतिहास

मुंबई तक

• 06:51 AM • 31 Oct 2022

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळला आणि अनेकांसाठी मृत्यूचा ‘काळ’ बनला. मोरबीची शान म्हटला जाणारा केबल ब्रिज 143 वर्षांचा होता, जो रविवारी 30 ऑक्टोबर 2022 रोजी अपघाताचा बळी ठरला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी ब्रिज स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आला होता. मच्छू नदीवर बांधलेला हा पूल मोरबीचे प्रमुख पर्यटन स्थळ होते. मोरबीचा केबल पूल […]

Mumbaitak
follow google news

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळला आणि अनेकांसाठी मृत्यूचा ‘काळ’ बनला. मोरबीची शान म्हटला जाणारा केबल ब्रिज 143 वर्षांचा होता, जो रविवारी 30 ऑक्टोबर 2022 रोजी अपघाताचा बळी ठरला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी ब्रिज स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आला होता. मच्छू नदीवर बांधलेला हा पूल मोरबीचे प्रमुख पर्यटन स्थळ होते.

हे वाचलं का?

मोरबीचा केबल पूल कधी बांधला गेला?

केबल ब्रिज (स्विंगिंग ब्रिज) मोरबीचे राजा वाघजी राव यांनी बांधला होता. ज्याचे उद्घाटन 1879 मध्ये झाले. ब्रिटीश अभियंत्यांनी बांधलेल्या या पुलाच्या बांधकामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. ब्रिटीश राजवटीत बांधलेला हा पूल उत्तम अभियांत्रिकीचा प्रतिक ठरला आहे. राजकोट जिल्ह्यापासून ६४ किमी अंतरावर मच्छू नदीवर बांधलेला हा पूल लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. ७६५ फूट लांब आणि ४ फूट रुंद असलेला हा पूल ऐतिहासिक असल्यामुळे गुजरात पर्यटनाच्या यादीतही समाविष्ट झाला होता.

मोरबी पूल हे अभियांत्रिकीचे जिवंत उदाहरण होते

ब्रिटीश अभियंत्यांनी बांधलेला हा पूल प्रगत अभियांत्रिकीचे जिवंत उदाहरण मानले जात होते. गुजरात राज्यातील मोरबी जिल्हा मच्छू नदीच्या काठावर वसलेला आहे. त्याच नदीवर मोरबी केबल ब्रिज बांधण्यात आला. मोरबीचा राजा प्रजावत्सल्य वाघजी ठाकोर याच्या काळात हा पूल बांधण्यात आला होता. राजा राजवाड्यातून मोरबी पुलावरून राजदरबारात जात असे असे म्हणतात.

दुरुस्तीनंतर पूल पुन्हा खुला करण्यात आला

पुलाच्या देखभालीची जबाबदारी ओरेवा ग्रुपकडे आहे. या गटाने मार्च २०२२ ते मार्च २०३७ या १५ वर्षांसाठी मोरबी नगरपालिकेशी करार केला आहे. हा पूल पाच दिवसांपूर्वी दुरुस्तीनंतर जनतेसाठी खुला करण्यात आला. पुलावर क्षमतेपेक्षा जास्त लोक उपस्थित होते, त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मोरबी पूल कधी आणि कसा फुटला?

मोरबी पूल दुर्घटनेने लोकांच्या सुट्टीच्या आनंदाचे क्षणार्धात शोकात रूपांतर झाले. मोरबी पुलाचा अपघात रविवारी, 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडला, त्यावेळी पुलावर सुमारे पाचशे लोक उपस्थित होते. नदीवर बांधलेल्या या केबल ब्रिज दुर्घटनेत आतापर्यंत १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध मोहीम सुरू आहे. त्याचबरोबर डझनभर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका झटक्यात तारांवर बांधलेला मोरबी पूल तुटून अनेक डझन लोक खाली वाहणाऱ्या नदीत पडले.

रात्रभर बचावकार्य

मोरबी पूल पडताच घटनास्थळी एकच गोंधळ आणि आरडाओरडा झाला. 143 वर्षे जुना मोरबी पूल कोसळल्यानंतर रात्रभर बचावकार्य करण्यात आले. NDRF च्या डझनभर पथकांनी रात्रभर नदीत लोकांचा शोध घेतला. अपघाताच्या चौकशीसाठी ५ जणांची एसआयटी नेमण्यात आली आहे. दुरुस्तीला १५ दिवस उलटूनही हा पूल अपघाताचा कसा बळी ठरला आणि त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    follow whatsapp