शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतं आहे की दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. एक मेळावा आहे उद्धव ठाकरे यांचा तर दुसरा मेळावा आहे एकनाथ शिंदे यांचा. एक पार पडणार आहे तो शिवाजी पार्क मैदानावर तर दुसरा मेळावा पार पडणार आहे तो बीकेसी मैदानावर. २१ जूनला शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंत शिवसेना दुभंगली आहे. एक गट आहे एकनाथ शिंदे यांचा दुसरा गट आहे तो उद्धव ठाकरे यांचा. दसरा मेळाव्याला हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशात बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात ठेवण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा कधी झाला होता? बाळासाहेब ठाकरे तेव्हा काय म्हणाले होते?
बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात
बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात ठेवली जाणार आहे. त्यासंबंधीची चर्चा सुरू झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेला हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे घेऊन जातो आहोत आणि उद्धव ठाकरेंनी याच विचारांशी फारकत घेतली आहे असा आरोप एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यापासूनच सातत्याने केला आहे. अशात आता बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा आम्ही पुढे नेत आहोत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही विचारांचे वारसदार आहोत असंही त्यांनी अनेकदा म्हटलं आहे. त्याचीच प्रचिती आज दसरा मेळाव्यात येणार आहे यात काहीही शंका नाही.
दसरा मेळावा: “विचारधारा विसरणाऱ्यांना धडा देणारा मेळावा” शिंदे गटाने आणला नवा टिझर
उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी दिलं सर्वात मोठं आव्हान
उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं आव्हान देत शिवसेनेत बंड पुकारलं. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार हे शिंदे गटात आहेत. तर १८ खासादारांपैकी १२ खासदार हे शिंदे गटात गेले आहेत. आज दसरा मेळाव्याच्या निमित्तानेही काही प्रवेश होणार आहेत. या सगळ्यामुळे कोंडी झाली आहे ती उद्धव ठाकरे यांची. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा जो मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्यांचा उल्लेख मिंधे गट असा केला होता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार भाजपचे मिंधे आहेत असा आरोप त्यांनी केला होता. तसंच महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी ऐकली होती मात्र बाप पळवणारी टोळी आली आहे असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे गटावर टीका केली होती. त्या टीकेला नंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून उत्तरही दिलं होतं.
आज दोन दसरा मेळाव्यात काय होणार?
आज बीकेसी आणि शिवाजी पार्क या दोन्ही मैदानावरचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही नेते एकमेकांवर टीका करणार आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहण्यास मिळणार आहेत. तसंच एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवण्यात येणार असल्याने त्याचीही चर्चा जोरदार सुरू झाली आहे. दोन्ही गटांनी एकमेकांना टिझरमधून उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे विविध टिझर आले आहेत. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे काय बोलणार आणि काय आरोप करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT