सांगली (स्वाती चिखलीकर) : जिल्ह्यातील मासाळवाडी गावात अंधश्रद्धेतून एक अमानवीय प्रथा सुरु असल्याच समोर आलं आहे. महालिंगराया देवाला केलेले नवस फेडण्यासाठी मंदिराच्या छतावरुन लहान मुलांना खाली सोडायचं आणि घोंगडीत झेलायचं ही प्रथा आजही सुरु आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ही गोष्ट समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात असून, जिल्हा प्रशासनाने तात्काळ ही प्रथा बंद करण्याची मागणी होत आहे.
ADVERTISEMENT
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावात महालिंगराया देवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेत नवस फेडण्यासाठी अत्यंत अघोरी प्रथेचं पालन केलं जातं. मंदिराच्या छतावर पुजारी उभा असतो. तो त्या लहान मुलांचे दोन्ही हात, पाय हे पकडतो आणि खाली घोंगडी धरून उभ्या असलेल्या लोकांकडे फेकतो.खाली त्या मुलाला झेलण्यासाठी चार लोक घोंगडी धरून लोक उभे असतात.
या चार जणांकडून त्या मुलांना पकडलं जातं. पण मुलांना पकडताना खाली अपघात झाल्यास, त्यात लहानग्याच्या जीवावरही बेतु शकते, याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. अशा पद्धतीने लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा अघोरी प्रकार निश्चितच अंगावर शहारे उभा करणारा आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय म्हणाली?
लहान मुलांना मंदिराच्या कळसावरुन फेकणं हा एक अघोरी अंधश्रद्धेचा प्रकार आहे. याची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने ती प्रथा बंद केला पाहिजे. राज्यात सध्या अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि लहान मुलांच्या हक्काचा कायदा अस्तित्वात आहे. यापूर्वी ही अशा अघोरी प्रथा, परंपरा काही गावांमध्ये सुरु होत्या. पण तत्कालीन जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी कारवाई करून त्या बंद केल्या होत्या. आताही जिल्हा प्रशासनाने तशीच खंबीर भूमिका घ्यावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केली आहे.
ADVERTISEMENT