टॉम पार्कर या सुप्रसिद्ध गायकाची ब्रेन ट्युमरशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. वयाच्या ३३ व्या वर्षी जगप्रसिद्ध गायक टॉम पार्कर याचं निधन झालं आहे. दोन वर्षांपूर्वीच त्याला ब्रेन ट्युमरने ग्रासलं. आज त्याची पत्नी केल्सी हिने इंस्टाग्रामवर टॉम गेल्याची बातमी दिली आहे.
ADVERTISEMENT
ब्रिटीश आयरीश बॉय बँड द वाँटेडचा सदस्य हा टॉम पार्कर होता. टॉम मागील दोन वर्षांपासून ब्रेन ट्युमरशी लढा देत होता. पण त्याची झुंज अपयशी ठरली. केल्सीने याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
काय म्हटलं आहे केल्सीने पोस्टमध्ये?
टॉमने आम्हा कुटुंबीयाच्या उपस्थितीतच अखेरचा श्वास घेतला. आमच्यावर दुःखाच डोंगर कोसळला आहे. टॉम हा आमच्या जगाचा केंद्रबिंदू होता. टॉम आमच्या जगण्याचा आधार होता. त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याची कल्पनाही सहन होत नाही. आम्हाला जो पाठिंबा आणि जे प्रेम सर्वांनी दिलं त्यासाठी आम्ही ऋणी आहोत. टॉम जिथे कुठे असेल तिथून त्याचं आम्हा सगळ्यांकडे लक्ष असेल. आमचा संपूर्ण वेळ टॉमची काळजी घेण्यात गेला. त्याने अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला.
टॉम आणि केल्सी यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. दोघांना एक मुलगी आणि मुलगा आहे. टॉमची मुलगी ऑरेलियाचा जन्म 2019 मध्ये झाला होता, तर मुलगा थॉमसचा जन्म 2021 मध्ये झाला होता. केल्सीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. एकामध्ये टॉमचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, तर दुसऱ्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र दिसत आहे.
2020 मध्ये गायक टॉम पार्करला ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने ही बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. तो म्हणाला की, मला त्या वेळी माहित होते की, जे होतंय ते काहीतरी चुकीचं आहे. परंतु, असं होईल हे कधीच वाटलं नव्हतं.
ADVERTISEMENT