जगभरात आज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आई, बहिण, बायको, मैत्रिण या रुपात महिलांचं प्रचंड मोठं योगदान असतं. महिलांचं समाजातील आणि कुटुंबातील योगदान साजरं करण्यासाठी खरंतर कोणत्याही एका दिवसाची आवश्यकता नाही…परंतू ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून का बरं साजरा केला जात असेल?? या दिवसामागची कहाणी जाऊन घेऊया थोडक्यात…
ADVERTISEMENT
जागतिक महिला दिन ही संकल्पना साधारण १९०० पासून राबवली जात आहे. हा काळ असा होता की जगभरात महिलांचं अस्तित्व आणि त्यांच्या योगदानाबद्दल नवीन विचार आणि बदल घडायला सुरुवात झाली होती. १९०८ मध्ये १५ हजार महिलांनी कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा हक्क मिळावा यासाठी न्यूयॉर्क शहराच्या दिशेने कूच केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे प्रश्न ऐरणीवर मांडण्याच्या दृष्टीकोनातून ही पहिली मोठी चळवळ मानली जाते. काही महिन्यांच्या या आंदोलनानंतर २८ फेब्रुवारी १९०९ मध्ये पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. यानंतर १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या ठराव आणि सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाईल हे निश्चीत करण्यात आलं.
भारतात ८ मार्च १९४३ मध्ये मुंबईत पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता. महिलांना समाजात समान हक्क आणि न्याय मिळावा यासाठी आजचा दिवस हा अधिक महत्वाचा मानला जातो. स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा आजच्या दिवशी केली जाते. मुंबई तक च्या सर्व महिला वाचकांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
ADVERTISEMENT