कोरोना काळात लोकल ट्रेन सेवा बंद होती. निर्बंध उठवत हळूहळू जसे नियम शिथील झाले तशा प्रमाणात लोकलही सुरू झाली. लसीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस झालेल्यांना पासही सुरू करण्यात आला. आता मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लसीकरण पूर्ण होऊन पंधरा दिवस झालेल्या लोकांना लोकल तिकिटही मिळू शकणार आहे. राज्य सरकारने आधी लोकलचं तिकिट बंद केलं होतं. तसे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तिकिट खिडकीवर वाद, गोंधळ आणि संताप पाहण्यास मिळाला होता. अशात आता लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेन प्रवासासाठीचं तिकिट मिळू शकणार आहे.
ADVERTISEMENT
रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अशा सूचना देखील राज्य सरकारने केल्याचे पत्रात आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दोन लस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि त्याला 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवासासाठी पास मिळायचा.
18 वर्षाच्या आतील मुलांना आणि काही मेडिकल कन्डिशनमुळे लस घेऊ शकले नसणाऱ्या नागरिकांना 15 ऑक्टोबरपासून रेल्वे प्रवासासाठी पास दिला जाऊ लागला आहे. 18 वर्षाखालील मुलांना प्रवासाच्या वेळी ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार. यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासासाठी पास देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळं 18 वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. तसेच काही महत्वाच्या मेडिकल कन्डिशनमुळे ज्या लोकांना लस घेता येत नाही अशांनाही रेल्वे प्रवासासाठी पास मिळणार आहे. अशा लोकांनी पास काढतेवेळी तसं डॉक्टरांचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.
ADVERTISEMENT