महाराष्ट्रात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील ७९ गावांना झिका व्हायरसचा संभाव्य धोका असल्याचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आरोग्य विभागाने या गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
ADVERTISEMENT
जिल्ह्यातील ७९ गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. यामध्ये सर्वाधिक १९ गावे हवेली तालुक्यातील असून, सर्वांत कमी म्हणजेच केवळ एक गाव आंबेगाव तालुक्यातील आहे. झिका, डेंगी व चिकुनगुनियासदृश आजार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मागील तीन वर्षांत सातत्याने डेंगी व चिकुनगुनिया या आजारांचा उद्रेक झालेल्या गावांची आकडेवारी पाहून ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
पुणे जिल्ह्यात ‘झिका’ साठी संवेदनशील ठरवण्यात आलेल्या ७९ गावांमध्ये डेंगी आणि चिकुनगुनिया सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आल्यास त्यांची झिका संसर्गाच्या अनुषंगाने रक्ताचे नमुने तपासले जाणार आहेत. याशिवाय गाव पातळीवर तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने उपाय योजना राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
झिका हा आजार एडीस डासांमुळे पसरतो. याच डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचा प्रसार होतो. या प्रकारचे डास महाराष्ट्र तसेच देशभरात मोठ्याप्रमाणात अढळून येतात. त्यामुळे झिका आजाराचा प्रसार होण्याचा धोका आहे. याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. नागरिकांना या आजाराची लक्षणं आढळल्यास तातडीने तपासणी करुन योग्य ते उपाय करावेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
तालुकानिहाय अतिसंवेदनशील गावे पुढीलप्रमाणे –
जुन्नर : आनंदवाडी, ओतूर, येणेरे, राजुरी, पिंपळवंडी, काळदरी.
खेड : राजगुरुनगर शहर, पांडूरंगनगर, शिरोली, आळंदी, मरकळ, भोसे, निघोजे, मोई, मेदनकरवाडी, गोसासी.
आंबेगाव : घोडेगाव.
शिरूर : वढू बुद्रूक, मांडवगण फराटा, गारमाळ, सादलगाव.
दौंड : दौंड शहर, समतानगर, होलारवस्ती, कुरकुंभ, हिंगणी बेर्डी.
इंदापूर : निमगाव केतकी, शेळगाव, यादववाडी, कुरवली, माळवाडी, तक्रारवाडी, भादलवाडी.
हवेली : देहू, नांदेडफाटा, नऱ्हे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे, खानापूर, मणेरवाडी, खेड, वाघोली, कोळवडी, मांजरी बुद्रूक, केशवनगर, उरुळीकांचन, शिंदवणे, कोरेगाव मूळ, खामगाव टेक, पिंपरीसांडस, थेऊर.
वेल्हे : करंजावणे, खामगाव क्षेत्र, ओसाडे, साखर, आंत्रोली.
मुळशी : माण, सूस.
बारामती: तरडोली, सुपा, काळखैरेवाडी, मोरगाव, सटवाजीनगर, अंबराई, आनंदनगर, तांदूळवाडी, माळेगाव विद्यानगर, सूर्यनगरी, कटफळ.
पुरंदर : सासवड, ढुमेवाडी, पारगाव, नीरा, सुपे खुर्द, बेलसर, जेजुरी. भोर भुतोंडे, चिखलावडे, वाठार.
ADVERTISEMENT