तलावाच्या शेजारी उभे राहून फोटोशूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडली. रात्री उशिरा या तिघांचेही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात स्थानिक लोकांना आणि पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे.
ADVERTISEMENT
दौंड शहरातील कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ नगरपालिकेच्या पाणी साठवण तलाव यांमध्ये या तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तलावाच्या भरावावर फोटोशूट करताना या तिघांचा पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. असरार अलीम काझी (वय 21), करीम अब्दुल दाही फरिद काझी (वय 20), आणि अतिक उझजमा फरीद शेख अशी या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या महाविद्यालयीन युवकांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (दि. 6 मार्च) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून फिरण्यासाठी बाहेर गेले होते. मात्र, घरी न परतल्याने रात्री उशिरा घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला , फोन बंद लागत होता. दुसऱ्या मित्राच्या मोबाईलवर फोन लावला तर फोन उचलला जात नव्हता. त्यामुळे तिघांच्या घरच्यांनी शोध मोहीम सुरू केली. अखेर तिघेही दौंड नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर फिरण्यासाठी जाणार असल्याची माहिती एकाने दिली त्यानुसार तलाव परिसरात शोध घेतला असता दुचाकी कपडे आणि बॅग असल्याचे आढळले.
मुलं पाण्यात बुडल्याची शंका आल्याने त्यांनी तातडीने दोन पोलिसांना कळविले दौंड पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तलावातील पाण्यात या मुलांचा शोध घेतला. अखेर रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. मृतांपैकी असरार हा बीए परीक्षा उत्तीर्ण झाला असून पुढील शिक्षण घेत आहे. तर त्याचा चुलत भाऊ करीम आणि त्याचा मित्र अतिक हे दोघेही पुना कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT