वर्षभरात तुमची नोकरी जाणार, तुरुंगात धाडणार! समीर वानखेडेंना नवाब मलिक यांचा इशारा

मुंबई तक

• 01:30 PM • 21 Oct 2021

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवर कारवाई करणाऱ्या समीर वानखेडेंना आता नवाब मलिक यांनी एक इशारा दिला आहे. हा इशारा मावळमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात देण्यात आला आहे. येत्या वर्षभरात तुमची नोकरी जाणार आणि तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना दिला आहे. नेमकं काय म्हणाले नवाब मलिक? ‘समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात […]

Mumbaitak
follow google news

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवर कारवाई करणाऱ्या समीर वानखेडेंना आता नवाब मलिक यांनी एक इशारा दिला आहे. हा इशारा मावळमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात देण्यात आला आहे. येत्या वर्षभरात तुमची नोकरी जाणार आणि तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना दिला आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय म्हणाले नवाब मलिक?

‘समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाणार आहे. तुझा तुरुंगावास निश्चित आहे. राज्यातील जनता पाहते आहे. वानखेडेची बोगसगिरी जगासमोर आणणार. समीर वानखेडेचा बाप बोगस होता, हा पण बोगस आहे.. याच्या घरातले सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला याने तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो, यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या तुझ्या बापाचं नाव सांग. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही’ असं म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबत एकेरीवर येत टीका केली आहे.

समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर छापा मारला. या प्रकरणात त्यांनी आठ जणांना अटक केली. यामध्ये सर्वात मोठं नाव आहे ते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचं. आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा अशी बडी मंडळी या पार्टीत होती. या प्रकरणी या सगळ्यांना अटक कऱण्यात आली. ही कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तीनवेळा पत्रकार परिषद घेऊन NCB ची सगळी कारवाई म्हणजे बनाव असल्याचा आरोप केला. यानंतर NCB नेही पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. तरीही नवाब मलिक यांनी आरोप करणं सोडलेलं नाही.

भाजपच्या इशाऱ्यावरून ही कारवाई करण्यात आली असा मुख्य आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच एनसीबीच्या माध्यमातून केंद्र सरकार मुद्दाम महाविकास आघाडी सरकारची बदनामी करतं आहे असंही मलिक यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी घेतलेली भूमिका शरद पवार यांनीही मान्य केली असून त्यांनीही काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय यंत्रणांचा वापर महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्यासाठी होतो आहे असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर मागील शुक्रवारी झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाचा आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला. महाराष्ट्रातल्या घराघरात गांजाचीच शेती होते अशा पद्धतीने महाराष्ट्राची बदनामी केली जाते आहे असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राला अकारण बदनाम करू नका असं भाजपला सुनावलं होतं.

या सगळ्यानंतर आता आज नवाब मलिक यांनी थेट समीर वानखेडेंनाच इशारा दिला आहे. तसंच वर्षभरात त्यांना तुरुंगात डांबणार आणि त्यांची नोकरी जाणार असा इशाराही दिला आहे.

    follow whatsapp