इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद
ADVERTISEMENT
औरंगाबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.औरंगाबाद महापालिकेच्या कोव्हिड सेंटरमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने दोन बोगस कोरोना रुग्ण भरती करण्यात आले आहेत. कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट घेऊन हे दोन्हीही बोगस रुग्ण महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल झाले होते.
गौरव काथार आणि गगन पगारे यांचे कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखवून जालन्यातील अलोक राठोड आणि त्याचा साथीदार कोविड सेंटरमध्ये भरती झाला होता. दोघांना प्रत्येकी 10 हजार रुपये देऊन रुग्णालयात भरती होण्यासाठी सांगण्यात आले होते.हा प्रकार आरोग्य अधिकार्यांच्या निदर्शनास आल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी औरंगाबादच्या सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद महापालिकेच्या मेलट्रॉन कोव्हिड रुग्णालयात बोगस रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर औरंगाबाद महानगरपालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बोगस रुग्ण तसेच बाधित रुग्णांच्या विरोधात मनपाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादमधील एका उद्यानाच्या बाहेर कोरोनाची अँटीजेन टेस्ट केल्यावर दोन रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं कळून आलं. नंतर या दोन्ही तरुणांनी आपल्या ऐवजी इतर दोन तरुणांना कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
काम लावतो म्हणून जालना येथून आणलेल्या तरुणांना बोगस रुग्ण बनवत त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि 10 दिवसांसाठी 10 हजार रुपये देण्याचं आमिष दाखवलं. तरुणांच्या प्रकार लक्षात आल्यावर त्यांचाही गोंधळ उडाला. त्यांनी कोव्हिड सेंटरमधून सुटका करण्याची मागणी केली. नंतर रुग्णालय प्रशासनाच्याही हा प्रकार लक्षात आला. या संपूर्ण घटनेने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता खरे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
निगेटिव्ह असलेले तरुण पॉझिटिव्ह रुग्णांसोबत उपचार घेत असल्याने त्यांना कोरोनाची बाधा होण्याचा आणि पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर मोकाट फिरत असल्याने त्यांच्याकडून कोव्हिडचा प्रसार होण्याचा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, राठोड आणि सदावर्ते यांची तत्काळ कोव्हिड चाचणी करण्यात आली. ते निगेटिव्ह आले. मात्र, त्यांना पुढील काही दिवस काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT