आतापर्यंत लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्याच्या कित्येक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. कधी लाच देण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक झाल्याचं ऐकलंय का? पण अशी घटना घडली आहे. वाळूचा जप्त केलेला ट्रक सोडण्यासाठी बहाद्दरांनी थेट तहसीलदारांना गुगल पे वरून ५० हजारांची लाच दिल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी दोघांनाही एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
ADVERTISEMENT
दत्तात्रय हिरामण पिंगळे (वय 33 रा. दौंड), अमित नवनाथ कांदे (वय 29 रा. मांजरी) असं अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी या घटनेची माहिती दिली. पुणे-सोलापूर रोडवरील शेवाळवाडी फाटा येथे वाळूचा ट्रॅक (mh 16, t 4100) हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना दिसला. त्यांनी ट्रक बाजूला घेण्यास सांगितला. ट्रक बाजूला घेतल्यानंतर ट्रकचालकाने तेथून पोबारा केला.
त्यानंतर काही वेळाने ट्रकचा मालक घटनास्थळी आला. तिथे आल्यानंतर ट्रक मालकाने तहसीलदार तृप्ती कोलते यांना पैशाचे आमिष दिले. त्यावर तहसीलदार कोलते यांनी पैसे घेण्यास नकार दिला.
ट्रक मालकाकडून ट्रक सोडवण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान तहसीलदार तृप्ती कोलते या पुढील कामासाठी निघू गेल्या. पुढे गेल्यानंतर त्यांना फोन आला. त्यावर समोरच्या व्यक्तीने त्यांच्याकडे बँक खात्याची माहिती मागितली.
‘तुमच्या खात्यात पैसे जमा करायचे आहे’, असंही त्याने तृप्ती कोलते यांना सांगितलं. तहसीलदार कोलते यांनी बँकेची माहिती न दिल्याने आरोपी दत्तात्रय हिरामण पिंगळे आणि अमित नवनाथ कांदे या दोघांनी तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या मोबाईल क्रमांकाच्या मदतीने ‘गुगल पे’ वर सुरुवातीला 1 रुपया आणि नंतर 50 हजार अशी एकूण 50 हजार 1 रूपयांची रक्कम जमा केली.
ट्रक मालकाने परस्पर खात्यावर रक्कम जमा केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर तहसीलदार कोलते यांनी एसीबीकडे यासंबंधी तक्रार केली. त्यानंतर दत्तात्रय हिरामण पिंगळे आणि अमित नवनाथ कांदे यांना लाच दिल्याप्रकरणी एसीबीने अटक केली आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT