हिंदुत्वात भाजपला भागीदार नको आहे त्यामुळेच त्यांना शिवसेना संपवायची आहे. त्यातूनच ही सगळी तोडफोड करण्यात आली असा गंभीर आरोप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना या मुलाखतीत विविध प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत उत्तरं दिली आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड का झालं? ते करण्यामागे भाजपचा काय हेतू होता? हे विचारलं असता उद्धव ठाकरे यांनी हे उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे? त्यांनी भाजपवर काय आरोप केला आहे?
शिवसेनेला आम्ही सोबत घेतलं आहे असं आता भाजपचं म्हणणं आहे. मात्र त्यांच्यासोबत जे गेले आहेत ते लोक म्हणजे शिवसेना नाही. तोडफोड करून त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेना संपवण्यामागे त्यांचा हेतू हाच दिसतो आहे की त्यांना हिंदुत्वात कुणीही भागीदार नको आहे. आत्ता जे काही केलंय ते अडीच वर्षापूर्वी केलं असतं तर सगळ्या गोष्टी सन्माने झाल्या असत्या.
भाजपचं हिंदुत्व तसंच शिवसेनेचं हिंदुत्व वेगळं कसं उद्धव ठाकरेंनी सांगितलं
भाजपला शिवसेना नुसती फोडायची नाही तर संपवायची आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तसंच शिवसेनेने हिंदुत्वासाठी राजकारण केलं. हिंदुत्व मजबूत झालं पाहिजे हा त्यामागचा हेतू होता. मात्र हे जे काही करत आहेत ते राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करत आहेत. आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक आहे. भाजपचं हिंदुत्व हे राजकारणात वापर करण्यासाठी म्हणून आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीमुळे हिंदुत्व संकटात आलं असं सांगितलं जातं त्याबाबत काय सांगाल? असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर मी हिंदुत्व सोडल्याचं एक उदाहरण मला दाखवा किंवा एखादा निर्णय दाखवा. महाराष्ट्र भवन अयोध्येत बांधलं जातं आहे. मुख्यमंत्री होण्याच्या आधीही रामाचं दर्शन घेतलं होतं तसंच मुख्यमंत्री झाल्यावरही गेलो होतो, कोण काय म्हणेल याची पर्वा मी केली नाही. हिंदू मंदिरांचं जतन करणं सुरू केलं. गड-किल्ले यांचं संवर्धन केलं. हिंदुत्व मी बाजूला ठेवलेलं नाही. शिवसेना आणि संघर्ष यांचं नातं जुनंच आहे. आत्ताही तो करावा लागतोय काही हरकत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT