ADVERTISEMENT
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांनी दिलेलं आव्हान स्वीकारत प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काही मोठी विधानं केलं. जाणून घेऊयात काय म्हणाले उद्धव ठाकरे…?
‘आणिबाणीच्या आठवणी काढायच्या. आणिबाणीच्या काळात जे विरोधात होते. तेच देशात आणिबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करत आहेत. हे मोडायचं असेल तर शिवसेनाच मैदानात हवी.’
‘गाढवं किंवा काही जनावरं वाघाचं कातडं पांघरतात, असं म्हणतात. तसंच यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलेलंय. आम्ही हिंदुत्व नाही सोडलेलं. आम्ही हिंदुत्त्वापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.’
‘अमित शहा पुण्यात आले. म्हणाले, एकट्यानं लढा.. ठिके! आम्ही एकट्यानं लढू, पण तुमच्या अधिकारांचा गैरवापर करायचा नाही. राजकारणात जसं भिडायचंय असतं तसं भिडा. मग होऊन दे सामना. ईडीची पिडा लावायची आणि लढ म्हणायचं, अशांनी शिवसैनिकाला आव्हान देण्याची गरज नाही.’
‘एकदा मी नवं हिंदू शब्द वापरला होता. या शब्दाचा वापर भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी केला. सोयीप्रमाणे बदलणारं हिंदुत्व आहे. भाजपची युती ही फक्त त्यांना सत्तेसाठी हवी होती. सत्तेसाठी संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारशीही त्यांनी युती केली. चंद्राबाबूंशी युती केली. सत्तेसाठी कुणाशीही युती करायला भाजप तयार आहे.’
‘ब्रिटिश काळात जसं वातावरण देशात तयार झालं होतं, तसं वातावरण तयार करण हे हिंदुत्व नाही. खरे हिंदू अस कदापि होऊ देणार नाही. आज आपण आणि देशातील नागरिक गप्प बसले, तर पुन्हा एकदा गुलामगिरी नशिबी येईल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.’
‘आज एनडीएमध्ये आता फार काही पूर्वीची लोकं राहिलेली नाही. पूर्वीची एनडीए तर आता शिल्लकच राहिलेली नाहीये. सर्वांना घेऊन तुम्ही जिंकले आणि एकटेच वरती जाऊन बसले. हे काही हिंदुत्व असू शकत नाही. हिंदुत्वासाठी सत्ता हवी होती, सत्तेसाठी आपण हिंदुत्वाचा वापर कधी केला नाही, कधीही करणार नाही, वापर शिवसेना कधीच करणार नाही.’
‘मला बोलवल्यानंतर मी सुद्धा मोदीजींचा अर्ज भरण्यासाठी अर्ध्यारात्री पोहोचलो. अमित शाहांचा अर्ज भरायला गेलो. आमचा चेहरा वापर केल्याचं ते म्हणताहेत, मग माझाही वापर करून तुम्ही जिंकलात, असं आम्ही म्हणू शकतो. कशाला हवा होतो मी तिकडे?’
‘दोन वर्षात आपण दोन विधान परिषदा हरलो. काही जण म्हणतात, आपल्यातच गद्दारी झाली. पण आता आपल्याच आईचं दूध विकणारी औलाद आपल्यात नाही. असे कुणी असतील तर त्यांनी शिवसेना सोडावी.’
‘बंगालच्या वाघिणीचा आदर्श घ्या. तिनं एकच फटका मारला की नजिकच्या काळात हे (भाजप) तिकडे पुन्हा पीरपीर करायला जातील असं मला वाटत नाही.’
‘मी बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत, त्या काळजीवाहू विरोधकांना भगव्याचं तेज दाखवणार. विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही. काळजीवाहू विरोधक हे कधीकाळी आपले मित्र होते. 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. काही दिवसांपूर्वी बोलून दाखवलेलं हेच. तेच माझं मत आजही कायम आहे.’
ADVERTISEMENT