मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे. त्यामध्ये बऱ्याच कालावधीनंतर उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांचं रणशिंग उद्धव ठाकरे फुंकणार आहेत. आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे मेळावा घेत आहेत, तर तिकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आजचा शिवसेनेचा मेळावा महत्त्वाचं असणार आहे कारण आगामी काळात दसरा मेळावा देखील होणार आहे. गोरेगामधील नेस्को मैदानात हा मेळावा होणार आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदा जाहीर मेळाव्यात भाषण करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष आहे. मागच्या ३० वर्षांपासून मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी शिवसेनेला कंबर कसावी लागणार आहे. कारण सध्या एकनाथ शिंदेंनी बंड केल्यामुळे शिवसेना कमकुवत झाली आहे. आणि शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईमध्ये येऊन गेले आहेत.
दसरा मेळावा, दोन्ही गटातील राडे याबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार?
दसरा मेळाव्यावरुन सध्या शिवसेना आणि शिंदे गटामध्ये संभ्रम आहे, कारण मेळावा कोण घेणार, कुठे घेणार याबाबत अजून स्पष्टता नाहीये. त्यामुळे आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे या विषयी जाहीरपणे बोलतात का? याकडे शिवसैनिकांचं लक्ष असणार आहे.
मागच्या काळात शिवसेना आणि शिंदे गटामध्ये अनेकदा राडे झाले आहे. प्रभादेवी, ठाणे, दापोलीमध्ये राडे झाले आहेत. यावरुन उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याचबरोबर अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, बंडखोर नक्की उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण हे मेळाव्यामध्येच समजणार आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये कशासाठी गेले आहेत?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत. त्यांच्यासोबत काही आमदार, खासदार देखील असणार आहेत. ते दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याची शक्यता आहे. नुकताच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे, त्यामुळे शिंदे सरकारवरती टीकास्त्र डागलं जात आहे. आजच्या दिल्ली दौऱ्यामध्ये महाराष्ट्रात कोणता नवीन उद्योग आणता येऊ शकतो का? याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
तेजस ठाकरेंची राजकारणात ‘एन्ट्री’?
दरम्यान दादरमधल्या शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेणार हे अद्याप ठरलेलं नाही. त्याअगोदरच शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये तेजस ठाकरेंचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोस्टरवरती उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचा मुहुर्त साधत तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
ADVERTISEMENT