उद्धव ठाकरे खोटारडे, कपटी, दुष्ट बुद्धीचे आहेत अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे म्हणजे खोटारडा माणूस आहे. जी काही नाटकं सुरू आहेत ती फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी. अडीच वर्षात या माणसाने फक्त पैशांची कमाई करणारी खोकी कमवली. नगरविकास खातं दिलं होतं एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि ते चालवत होते आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे असाही आरोप नारायण राणे यांनी केला.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद संजय राऊत यांच्यामुळेच गेलं
उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद संजय राऊत यांच्यामुळेच गेलं. मी विजयी ठरलो, मी मोहीम फत्ते केली माझे गुरू शरद पवार यांनी दिलेलं काम मी करून दाखवलं असं समाधान संजय राऊत यांना आहे असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. एवढंच नाही तर आत्ताची मुलाखत उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी घेतली आहे असाही आरोप नारायण राणे यांनी केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.
काय म्हटलं आहे नारायण राणे यांनी?
उद्धव ठाकरेंनी कोणत्या शिवसैनिकांना विश्वास दिला? कोणत्या आमदार, खासदाराला मदत केली? एकाही शिवसैनिकाला प्रेम किंवा विश्वास दिला आहे का? या सगळ्याचं उत्तर नाही असं आहे. आता त्याच लोकांना उद्धव ठाकरे गद्दार म्हणत आहेत. मी आज वृत्तपत्रात हे पण वाचलं की एकनाथ शिंदेंना मारण्यासाठी सुपारीही दिली होती. हा काही पहिला प्रसंग नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतली माणसं मोठी होऊ लागली तसं एकेकाला कमी करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं असाही आरोप नारायण यांनी केला. रमेश मोरेची हत्या कुणी केली? जयेंद्र जाधवची हत्या कुणी केली? ठाण्यातल्या एका नगरसेवकाची हत्या कुणी केली? मी २००५ मध्ये शिवसेना सोडली तेव्हा माझ्यावरही मारेकरी पाठवले होते असाही आरोप नारायण राणे यांनी केला. मला मारण्यासाठी देशाबाहेरच्या लोकांनाही सुपारी दिली होती. ज्यांना सुपारी दिली होती ते लोक माझ्याशी बोलले होते. त्यांनीच मला सावध राहण्याचा इशारा दिला होता.
उद्धव ठाकरे म्हणजे नाटकी माणूस
उद्धव ठाकरे म्हणजे एक नंबरचा नाटकी माणूस आहे. राज्यातल्या माणासाला मुलाखतीचा काय फायदा? एकीकडे रडून दाखवायचं दुसरीकडे कपटीपणा करायचा. जी मुलाखत घेतली जाते आहे त्याचा महाराष्ट्राला काय फायदा? असाही प्रश्न नारायण राणे यांनी विचारलाआहे.
ADVERTISEMENT