शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा कुठे होणार? हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने निकाली निघाला. मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या दिवशीच शिंदे गटाचाही मेळावा होणार असल्यानं मुंबईतल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला तोंड फुटलंय. न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्था बघण्यासंदर्भात पोलिसांना आदेश दिलेत. आता याच मुद्द्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण करू दिलीये.
ADVERTISEMENT
बीएमसी अर्थात बृहन्मुंबई महापालिकेनं शिवसेना आणि शिंदे गटाचा शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा अर्ज फेटाळून लावला. शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीचे अर्ज महापालिकेनं जे कारण सांगून फेटाळले, ते म्हणजे मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उत्तर म्हणून शिंदे गट प्रति दसरा मेळावा घेणार अशी चर्चा सुरू झाल्यापासूनच मुंबईतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेला आलेला आहे. त्यात गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर ठाकरे-शिंदे गटात झालेल्या संघर्षाने याची प्रचितीही आलीये. त्यामुळेच मेळाव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचं काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय.
‘मी त्याचवेळी म्हणालो होतो,…’; शिवसेना दसरा मेळावा निकालावर अजित पवार काय म्हणाले?
शिवसेना दसरा मेळावा आणि कायदा आणि सुव्यवस्था; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळीही त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, “दोन गट झालेले नाहीत. शिवसेना आमची आहे ती तशीच आहे. तुम्ही पाहाताय, तर ती वाढलीये. फोफावलीये. परवाचा आमचा मेळावा फक्त मुंबईतल्या गटप्रमुखांचा होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी न्यायालयाने राज्य सरकारवर टाकलीये. राज्य सरकार सुद्धा याला जबाबदार राहणार आहे आणि राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल, अशी मला आशा आहे.”
‘सदा सरवणकरांनी न्यायालयाची दिशाभूल केली’; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे का म्हणाले, शुभ बोल नाऱ्या?
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, “प्रत्येक वेळी आपण वाईटाचा विचार करू नये. आपण असं म्हणतो ना शुभ बोल नाऱ्या. ती म्हण आहे म्हणून मी बोलतोय. आता चांगली सुरूवात झालीये आणि विजयादशमीचा मेळावा हा… पहिला मेळावा सुद्धा मला आठवतो. माझे आजोबा तिथे होते. शिवसेनाप्रमुखांनी ही परंपरा सुरू केली. ती आम्ही पुढे चाललोय. कोरोना काळ सोडला, तर कधीही हे चुकलं नाही”, असंही ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी मैदान मारलं! शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच
उद्धव ठाकरेंचा रोख शिंदे गटाच्या दिशेने?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर सातत्यानं ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सातत्यानं पाहायला मिळतोय. त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे सत्तेत असलेल्या शिंदे गटालाच इशारा दिलाय. दसरा मेळाव्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था राखली जाईल, याची काळजी शिंदे गटाने घ्यावी, असाच रोख ठाकरेंचा या विधानामागे होता, असं म्हटलं जातंय.
ADVERTISEMENT