मी मुख्यमंत्री असताना माझ्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्या. एकदा नाही दोनदा झाली. एका सकाळी मला जाणवलं की मला हालचालच करता येत नाहीये. त्यावेळी माझी जी काही अवस्था झाली तो वेगळाच अनुभव होता. मी आजारपणातून उठूच नये म्हणून काही लोक देव पाण्यात बुडवून बसले होते तेच आज पक्ष बुडवायला निघाले आहेत अशी टीका करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना फटकारलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत संजय राऊत यांनी सामनासाठी घेतली. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना विविध प्रश्न विचारले. त्यातल्या आजारपणाविषयीच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी हे उत्तर दिलंय.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता काय टीका केली ?
आपण आजारी होतात तेव्हाच काही जण पक्ष फोडत होते तुम्हीही त्याचा उल्लेख केला आहे.. हा प्रश्ना विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझ्यावर शस्त्रक्रिया झाली मी बरा होत होतो. एक दिवस अचानक मला मानेची हालचालच करता येत नव्हती. त्यानंतर गोल्डन अवर जो काही म्हणतात त्यात उपचार मिळाले, योग्य ते ऑपरेशन झालं त्यामुळे तुमच्यासमोर मी बसलो आहे.”
”मात्र मी या अवस्थेत होतो तेव्हाही मी यातून बरा होऊ नये म्हणून काही लोक देव पाण्यात बुडवून बसले होते. तेच लोक आज पक्ष बुडवायला निघाले आहेत. माझी हालचाल होत नव्हती त्या काळात यांच्या हालचाली जोरात होत होत्या ही वेदना माझ्या मनात कायमची राहिल. मी या लोकांना जबाबदारी दिली होती. नंबर दोनचं पद दिलं होतं. मी विश्वास ठेवला होता त्यांनीच विश्वासघात केला.” एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता ही टीका त्यांनी केली.
शिवसेनेत विश्वासघाताचं राजकारण का केलं जातं यावर काय म्हटले उद्धव ठाकरे
शिवसेनेत ही विश्वासघात केला जाण्याची पहिली वेळ नाही.. असं का घडतं? असं जेव्हा संजय राऊत यांनी विचारलं तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, ”आम्ही आमचा पक्ष प्रोफेशनली चालवत नाही. एक परिवार म्हणून आम्ही पक्षाकडे पाहतो. आपलं म्हटलं की आपलं, बाळासाहेब ठाकरे-मां यांनी हेच संस्कार घडवलं. आमचं हे चुकत असेल की एखाद्यावर विश्वास ठेवला की आम्ही तो अंधविश्वास ठेवतो. हिंदुत्व सोडल्याची बोंब आत्ता जे आमच्या नावाने मारत आहेत त्यांनी २०१४ ला आपल्यासोबत युती तोडली होती. तेव्हा आम्ही कुठे हिंदुत्व सोडलं होतं? तरीही युती का तोडली? त्यानंतर काही काळ आपल्यावर विऱोधात बसायची वेळ आली होती. ते विरोधी पक्षनेतेपद यांनाच दिलं होतं. आत्ताही भाजपने जे काही केलंय ते २०१९ मध्येच केलं असतं तर सन्मानाने झालं असतं. देशभरात पर्यटन करायची गरज लागली नसती. हजारो कोटी रूपये खर्च झाले नसते. सगळं फुकटात झालं असतं” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि एकनाथ शिंदेवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT