Congress First list of UP candidate: काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. प्रियंका गांधी यांनी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 50 महिला उमेदवारांसह 125 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
ADVERTISEMENT
प्रियांका गांधी यांनी सांगितले की, काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये महिला तसेच काही पत्रकार, एक अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश आहे.
मोठ्या नावांबद्दल बोलायचे झाले तर सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद यांना तिकीट देण्यात आलं आहे. उन्नावमधून काँग्रेसने आशा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय NRC-CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या सदफ जाफर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय पूनम पांडे हिला देखील तिकीट मिळाले असून, ती एक आशा वर्कर आहे.
‘पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या महिला संघर्षशील आणि धाडसी महिला आहेत. काँग्रेस पक्ष त्यांना पूर्ण पाठिंबा देईल,’ असे प्रियंका गांधी यांनी काँग्रेसची पहिली यादी जाहीर करताना सांगितले
काँग्रेसची यादी जाहीर करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘आमची उन्नावमधील उमेदवार उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेची आई आहे. त्यांचा संघर्ष सुरू ठेवण्यासाठी आम्ही त्यांना संधी दिली आहे. ज्या सत्तेच्या माध्यमातून त्यांच्या मुलीवर अत्याचार झाले, तिचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, तीच सत्ता त्यांना मिळाली पाहिजे.’
यावर राहुल गांधींनीही ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, ‘ज्यांच्या मुलीवर उन्नावमध्ये भाजपने अन्याय केला, आता ती बनेल न्यायाचा चेहरा- लढणार, जिंकणार!’
सोनभद्र हत्याकांडातील पीडितांपैकी एक रामराज गोंड यांनाही काँग्रेसने यावेळी तिकीट दिलं असल्याचं सांगण्यात आले. त्याचवेळी आशा वर्कर्सपैकी एक पूनम पांडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रियांका म्हणाल्या की, ‘कोरोनामध्ये खूप काम करूनही आशा वर्कर्संना मारहाण करण्यात आली.’ तर सदाफ यांच्याबद्दल असे म्हटले की, ‘CAA-NRC दरम्यान झालेल्या संघर्षामुळे सरकारने पोस्टरमध्ये त्यांचा फोटो छापून छळ केला होता.’
यूपीमध्ये एकूण 403 जागा आहेत जिथे विधानसभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. या टप्प्यांतर्गत 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. उर्वरित राज्यांसह (पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा) निकाल 10 मार्च रोजी जाहीर होतील.
ADVERTISEMENT