कानपूरमधला अत्तर व्यापारी पियूष जैन याला कोट्यवधींच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पियूष जैनच्या घरातून आणि विविध छाप्यांमधून आत्तापर्यंत 257 कोटींची रोख रक्कम सापडली आहे. तर 23 किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे. मात्र इतकी सगळी संपत्ती बाळगणाऱ्या पियूषला पाहून कुणी कोट्यधीश म्हणणारही नाही. कारण त्याची राहणी अत्यंत साधीच होती. आता पियूष जैनला बेहिशेबी कोट्यवधी रूपये, सोनं, चांदी हे बाळगल्याप्रकरणी अटक झाली आहे. तरीही त्याची आम जिंदगीही चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
अत्तर व्यापारी पियूष जैनच्या घरात 257 कोटी, 20 किलोहून जास्त सोनं जाणून घ्या काय काय हाती लागलं?
काय होती पियूष जैनची लाईफस्टाईल?
आपल्या अत्तराच्या व्यवसायातून टॅक्स चुकवून कुबेराप्रमाणे संपत्ती गोळा करणारा पियूष जैन याने कधीही त्याच्या श्रीमंतीचा बडेजाव केला नाही. त्याच्या शेजाऱ्यांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार तो इतका साधा राहात होता की त्याच्याकडे पाहून कुणाला स्वप्नातही वाटलं नसतं की याच्याकडे इतका पैसा आहे. तो आजही स्कूटर चालवत असे. तसंच साधे कपडे आणि हवाई चप्पल घालून फंक्शनमधे जाणं त्याच्याठी नित्याची बाब आहे. कुणाशी वैर नव्हतं, कुणाशी दोस्ती नव्हती.
कन्नौज या ठिकाणी पियूष जैनच्या शेजारीपाजारी आज तकच्या टीमने चौकशी केली. त्यावेळी आज तकच्या टीमलाच बुचकळ्यात पडल्यासारखं झालं. कोट्यवधी रूपये घरात बाळगून असलेला हा माणूस अत्यंत साधेपणाने राहात होता. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आजोबांच्या वडिलांचं नाव फूलचंद जैन असं होतं. त्यांचा कपड्यांवर छपाई करण्याचा व्यवसाय होता. त्याचप्रमाणे ते छपाईच्या व्यवसायातही होते.
पियूष जैनचे आजोबा फुलचंद जैन आणि त्याचे वडील महेशचंद्र जैन हे आधी कापडावर छपाई करून देण्याचा व्यवसाय करत होते. पियूषने त्याच्या कामाची सुरूवात मुंबईच्या एका कंपनीत सेल्समन म्हणून केली होती. त्याचा केमिस्ट्रीचा चांगला अभ्यास असल्याने त्याने साबण, डिटर्जंट यांचे कंपाऊंड तयार करण्यासही सुरूवात केली. त्यानंतर तो गुटखा आणि पान मसाला या व्यवसायात आला. पियूषच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पियूष आणि अंबरीश असे दोन भाऊ आहेत. दोघांनी कानपूर विद्यापीठातून केमिस्ट्री हा विषय घेऊन Msc केलं. अंबरीशला तीन मुलं आहेत आणि पियूषलाही तीन मुलं आहेत. यापैकी एक मुलगी आहे आणि तिचं लग्नही झालं आहे. पेशाने ती पायलट आहे.
पियूष जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने त्याच्या वडिलांचा व्यवसाय पुढे वाढवला. साबण आणि डिटर्जंटसोबत त्याने गुटखा आणि पान मसालाही तयार कऱण्यास सुरूवात केली. मोठ्या कंपन्यांना तो आपलं उत्पादन विकू लागला. त्यानंतर हळूहळू त्याच्याकडे पैसे येत गेले. पियूष जैन कनौजहून कानपूरला आले ते व्यवसाय वाढल्यामुळेच.
पियूष जैनच्या घरावर जेव्हा धाड पडली तेव्हा लोकांना समजलं की पियूष जैनकडे एवढी संपत्ती आहे. कुणीही याबाबत विचार केला नव्हता की पियूषकडे इतकी संपत्ती आहे. छाप्यांच्या दरम्यान आयकर विभागाने 257 कोटी रूपये रोख, 23 किलो सोनं आणि 6 कोटी रूपयांचं चंदन तेल तसंच 300 चाव्या जप्त केल्या आहेत. याशिवाय त्याच्या घरात एक तळघरही होतं हेदेखील समजलं आहे. पियूषच्या संपत्तीचा आणि मिळालेल्या मालमत्तेचा आकडा 1 हजार कोटींच्या घरात गेला आहे असंही समजतं आहे.
ADVERTISEMENT