राज्यात एकत्र असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. कळव्यात लसीकरण मोहिमेचं बॅनर फाडल्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद झाला आहे. हे बॅनर अज्ञातांनी फाडलं असलं, तरी त्यावरून शिवसेनेला लक्ष्य करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
लसीकरणाबद्दल जनजागृती करणारं आणि माहिती देणारं बॅनर राष्ट्रवादीकडून लावण्यात आलं होतं. हे बॅनर फाडून टाकण्यात आल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून माहिती दिली. तसेच पोलिसांनी दखल घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले तर आपली जबाबदारी नाही, असं आव्हाड म्हणाले होते.
ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत वाद, लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं – आनंद परांजपे
या ट्वीटनंतर जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी सायंकाळी पुन्हा एक ट्वीट केलं. ज्यात एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ असून, यात काही हालचाली कैद झालेल्या आहेत. हा व्हिडीओ ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना सवाल केला आहे.
‘आरोपी कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर फाडतानाचा हा पुरावा आहे. पोलीस कारवाई करणार का?’, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
महापालिका आयुक्त शिवसैनिक होणार आहेत का?
‘जिथे-जिथे महापालिकेकडून लसीकरण होत आहे, तिथे तिथे शिवसेना पोस्टरबाजी करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा हे आता शिवसैनिक होणार आहेत का? महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासनामार्फत हे लसीकरण सुरु आहे. त्यामुळे याचं श्रेय हे फक्त शिवसेनेचं नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचं आहे’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि ठाणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांनी काय दिलाय इशारा?
‘कळव्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी म्हणून लावण्यात आलेले बॅनर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फाडले. त्याबद्दल पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही उग्र भूमिका घेतली, तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही’, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना इशारा दिलेला आहे.
ADVERTISEMENT