काँग्रेसनं राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेत पुन्हा एकदा वीर सावरकर यांचे फोटो झळकले आहेत. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि वीर सावरकर यांना एकत्र दाखवण्यात आलंय. भारत जोडो यात्रेच्या पोस्टर्समध्ये छेडछाड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी आता काँग्रेस गुन्हा दाखल करणार आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसची भारत जोडो यात्रा कर्नाटकातून पुढे जात आहे. गुरुवारी (६ ऑक्टोबर) यात्रेत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी झाल्या. त्याचवेळी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत वीर सावरकर यांच्यासोबत राहुल गांधींचे पोस्टर्स झळकल्याचा प्रकार समोर आला. हे पोस्टर्स सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.
राहुल गांधी यांच्यासोबत वीर सावरकर यांचा फोटो असलेले पोस्टर्स भारत जोडो यात्रेदरम्यान झळल्यानं याची दखल काँग्रेसकडून घेण्यात आलीये. काँग्रेसनं या प्रकरणाची माहिती घेतली असून, आता या प्रकरणात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे नेते मोहम्मद नलपद यांनी म्हटलंय की, ‘काही खोडसाळ वृत्तीच्या लोकांकडून हे केलं गेलं आहे. काँग्रेसकडून हे पोस्टर्स लावले गेलेले नाहीत. आम्ही याविरोधात मांड्या जिल्हा पोलिसांत तक्रार देऊ.’
7 सप्टेंबर रोजी काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झाली. ही यात्रा ३० सप्टेंबर रोजी कर्नाटकात दाखल झाली. ही यात्रा कर्नाटकात दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर पोस्टर्स लावले गेले होते, ते फाडण्यात आले होते. यावरून काँग्रेसनं भाजपवर आरोप केला होता.
केरळातही भारत जोडो यात्रेत झळकले होते सावरकरांचे पोस्टर्स
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत वीर सावरकर यांचे पोस्टर्स झळकण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही असे पोस्टर्स झळकलेत. त्यावेळी काँग्रेसनं प्रिटिंगवेळी झालेल्या चुकीमुळे हे घडल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी केरळात हे पोस्टर्स लावले गेले होते.
या पोस्टर्सवर स्वातंत्र्यसैनिकांसोबत वीर सावरकर यांचा फोटोही छापण्यात आला होता. ज्यावरून भाजपनं काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्याला काँग्रेसचे जयराम रमेश यांनी उत्तरही दिलं होतं.
केरळातल्या त्रिशूर जिल्ह्यात भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी काँग्रेसचं कार्यालय भगव्या रंगाने रंगवण्यात आलं होतं. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर काँग्रेसनं म्हटलेलं होतं की, कार्यालय तिरंगा रंगाने रंगवायचं होतं. मात्र रंगोटी करणाऱ्यांनी फक्त भगव्या रंगाने रंगवलं.
ADVERTISEMENT