ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाने आत्तापर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हेच विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यामुळे त्यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास
विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवतो आहे. तसंच त्यांना जलोदर झाला आहे. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्रम गोखले यांनी अनेक नाटकांमधून, सिनेमांतून आणि सीरियल्समधून कामं केली आहेत. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकांमधल्या अभिनयातून संन्यास घेतला आहे. मात्र सिनेमांमध्ये त्यांनी काम करणं सुरू ठेवलं आहे. नुकत्याच रिलिज झालेल्या गोदावरी या सिनेमात नारोशंकर देशमुख ही भूमिका त्यांनी साकारली आहे. मारूतीच्या पायाला पाणी लागलं का? हा त्यांचा एकमेव डायलॉग सिनेमात आहे मात्र त्यांनी स्मरणात राहणारी भूमिका साकारली आहे.
विक्रम गोखले काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहवरच्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत दिसले होते. या मालिकेत विक्रम गोखले यांनी खास एंट्री दाखवण्यात आली होती. मालिकेतल्या मल्हार म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या गुरुंची भूमिका विक्रम गोखलेंनी साकारली होती. अनेक वर्षांनी तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला आले. या आधी या सुखांनो या! या मालिकेत ते दिसले होते.
विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असतात. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अभिनय क्षेत्रात विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं योगदान आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. वजीर या सिनेमातली त्यांची पुरूषोत्तम कांबळे ही भूमिकाही गाजली. तसंच रंगभूमीवर बॅरीस्टर हे नाटक त्यांनी आपल्या भूमिकेतून अजरामर करून ठेवलं आहे.
ADVERTISEMENT