Vijay Wadettiwar Jitendra Awhad Jayant patil : हिवाळी अधिवेशन संपताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेत्यामध्येच ठिणगी पडली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी निधी वाटपावरून थेट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना घेरलं. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना उरलेल्यांनाही फोडा, असं विधान केलं. जयंत पाटलांचं हे विधान काँग्रेसबद्दल असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी केलेल्या विधानांनंतर विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच ठिणगी पडल्याचे दिसत आहे. (Vijay Wadettiwar hits out at jitendra awhad and jayant patil)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाडांनी निधी वाटपावर बोलताना आवाहन केलं होतं. “विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड, तर काहींना पिठलं-भाकरी मिळाली. काही ठराविक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला. ९० टक्के आमदारांना निधी मिळालाच नाही. विरोधी पक्षाच्या ज्या नेत्यांना निधी मिळाला, त्यांनी तो घेऊ नये. एकत्रित राहायचं आहे. सर्वांनी एकसारखं राहायला हवं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेले.
विजय वडेट्टीवारांनी एकेरी भाषेत केली टीका
आव्हाडांचा रोख विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांकडे असल्याचे म्हटले गेले. याबद्दल वडेट्टीवारांना ज्यावेळी विचारलं गेलं. त्यावेळी ते चांगलेच संतापले आणि एकेरी उल्लेख करतच त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर शाब्दिक हल्ला चढवला.
हेही वाचा >> एका शब्दामुळे फसला आरक्षणाचा तिढा; महाजनांनी सांगितला कायदा
वडेट्टीवार म्हणाले, “विरोधी पक्षनेत्याला एकट्यालाच निधी मिळाला नाही. तो (जितेंद्र आव्हाड) काय बोलतो? हे त्यालाच कळेना. तो भांबावला आहे. तो पागलसारखा झाला आहे. आम्ही कुणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाहीत. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरातांना कमी अधिक प्रमाणात निधी मिळाला आहे. आम्हाला २६-२७ कोटी रुपये मिळाले आहेत”, अशा शब्दात वडेट्टीवारांनी आव्हाडांनी केलेल्या विधानाला उत्तर दिलं.
‘आता उरलेल्यांनाही फोडा’, जयंत पाटलांना वडेट्टीवारांनी काय दिलं उत्तर?
जयंत पाटील यांनी विधानसभेत राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. पाटील म्हणाले होते की, “गृह खात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि एवढे उद्योग आहेत… एक पक्ष फोडला. दुसरा पक्ष फोडला. आता उरलेल्यांनाही फोडा”, असा टोला पाटलांनी फडणवीसांना लगावला होता.
हेही वाचा >> जातनिहाय जनगणनेबद्दल संघाने बदलली भूमिका, पण…
आधी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट भाजपसोबत गेला. त्यामुळे पाटील काँग्रेसबद्दल बोलल्याचं म्हटलं गेलं. पण, या विधानांवर बोलताना वडेट्टीवारांनी राष्ट्रवादीचा उरला सुरला गट भाजपसोबत जाईल असं विधान केलं. विजय वडेट्टीवार म्हणाले, “ते मला माहिती नाहीये कोणता पक्ष आहे. कदाचित होऊ शकतं की उरले सुरले जे आहेत, ते तिसरेच आहेत ना. कदाचित त्यांच्या डोक्यात असेल.”
हेही वाचा >> फडणवीस-पवारांचा पहाटेचा शपथविधी शिंदेना भोवणार? ठाकरेंच्या वकिलांनी गाठलं खिंडीत
विजय वडेट्टीवारांनी जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांवर हल्ला चढवला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. आता यावर आव्हाड आणि पाटील काय बोलणार हेही महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT