राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे नेते जे.पी. नड्डा यांनी ही नियुक्ती केली. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी विनोद तावडे यांची नियुक्ती केल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली. स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील व्यक्तीला सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाली आहे. या नियुक्तीमुळे तावडे यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी मिळाली आहे.
ADVERTISEMENT
वर्षाभरापूर्वी तावडे यांच्यावर राष्ट्रीय चिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याचबरोबर भाजपशासित हरयाणा राज्याचे प्रभारी व प्रधानमंत्री कार्यालयातील ‘मन कि बात’ व विविध केंद्र सरकारच्या योजनांची जबाबदारीही होती.
विनोद तावडे यांनी 1985 ते 1995 या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं. या दहा वर्षांच्या काळात अभाविपचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून ते कार्यरत होते. 1995 पासून ते भाजपत सक्रिय झाले. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, विधान परिषदेचे 13 वर्षे सदस्य, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
2014 ला बोरिवली विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्रातून क्रमांक दोनच्या मताधिक्याने सुमारे ऐंशी हजाराहून अधिक मताने निवडून आले होते. राज्यात भाजपचं सरकार असताना त्यांनी शिक्षण, युवक कल्याण व क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग, संसदीय कार्य अशा विविध विभागाचे मंत्री म्हणून काम केलं.
2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर विनोद तावडे यांची राष्ट्रीय चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तावडे यांच्यावर राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी सोपवून त्यांचं राजकीय पुनर्वसन केल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT