नागपूरवरुन रुग्णाला हैदराबादला घेऊन जाणाऱ्या एका एअर अँब्यूलन्सचा मोठा अपघात टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरवरुन उड्डाण केल्यानंतर विमानाचं एक चाक निखळून खाली पडलं. त्यातच विमानाच्या लँडींग गिअरने काम करणं बंद केल्यामुळे वैमानिकांनी संभाव्य धोका लक्षात घेत मुंबई विमानतळाशी संपर्क साधला. विमानात २ तास पुरेल इतकच इंधन शिल्लक असल्यामुळे विमान मुंबईत इमर्जन्सी लँडींग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ADVERTISEMENT
तिकडे मुंबई विमानतळावर हैदराबादला जाणाऱ्या विमानाच्या लँडींगसाठी तयारी करण्यात आली. रन-वे वरती फेस तयार करुन टाकण्यात आला. विमानाचा लँडींग गिअर काम करत नसल्यामुळे अपघात होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आल्याचं समजतंय.
या घटनेची एक्सक्लुजिव्ह दृष्य मुंबई तक च्या हाती लागेलली आहेत.
VT- JIL कंपनीचं हे विमान अखेरीस ९ वाजल्याच्या दरम्यान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं. या विमानात २ कर्मचारी, १ डॉक्टर, १ वैद्यकीय अधिकारी आणि १ रुग्ण होता. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जिवीतहानी झालेली नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मुंबई विमानतळावर लँडींग करण्यात आल्यानंतरचे फोटो पाहिल्यानंतर योग्य वेळेत वैमानिकांनी हा निर्णय घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला असं बोललं जातंय. दरम्यान विमानातील सर्व प्रवाशांची मुंबई विमानतळावर वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
ADVERTISEMENT