– वसंत मोरे, बारामती प्रतिनिधी
ADVERTISEMENT
शेती परवडत नाही अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते. परंतू जिद्द-चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर भाडेतत्त्वावर केलेल्या शेतीमध्ये देखील लाखो रुपयांचा फायदा मिळवता येतो. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या मावडी गावच्या उच्चशिक्षित पवार कुटुंबाने हे सिद्ध करुन दाखवले आहे.
विशाल पवार आणि सागर पवार हे दोघे सख्खे भाऊ. त्यांची पुरंदर तालुक्यात मावडी गावात एक शेती आहे. दोघांनीही शेतकी विषयातून बीएससीचं शिक्षण घेतलेले आहे. पवार कुटुंबातील इतर सदस्यही उच्चशिक्षित आहेत. परिसरातील शेतक-यांना मार्गदर्शन करत वडिलोपार्जित असलेल्या एक एकर शेतीमध्ये पवार कुटुंबाने कलिंगड आणि खरबूजची शेती करायला सुरुवात केली. गेली चार वर्ष पवार कुटुंबाला कलिंगडांतून चांगले उत्पन्नही मिळालं.
मात्र गेल्या वर्षी कलिंगडाचा तोडा सुरू असतानाच कोरोनाच्या संकटाने लॉकडाऊन लागलं. हातातोंडाशी आलेला घास कवडीमोल किमतीने विकावा लागणार त्यामुळे पवार कुटुंबीय अस्वस्थ झाले. परंतू हार न मानता त्यातून मार्ग काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूला स्टॉल लावून कलिंगडाची विक्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला आणि अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्नही मिळालं.
यशाचं सूत्र सापडलेल्या पवार कुटुंबाने यानंतर मागे वळून पहायचं नाही असं ठरवलं. यंदाच्या वर्षी आपल्या एक एकर क्षेत्रा व्यतिरिक्त गावातल्या एका शेतकऱ्याची तीन एकर शेती पवार कुटुंबाने भाडेतत्वावर घेतली. त्यात कलिंगड आणि खरबूज लावून संपूर्ण कुटुंबाने बारामती मोरगाव रस्त्यावर त्याची विक्री केली. पवार कुटुंबियांना यंदाच्या वर्षी जवळपास ७० टन उत्पन्न मिळाले. दोन महिन्यांपासून हे कुटुंब शेतीच्या बांधावर खरबूज आणि कलिंगडाची विक्री करीत आहे. त्याला ३० ते ४० रुपये किलो दर मिळत आहे. तर कलिंगडाला २५ रुपये किलो दर मिळत आहे. पवार कुटुंबियांना यंदाच्या वर्षी चक्क बारा लाख रुपयांचा नफा मिळाला. त्यातून एकूण चार एकर क्षेत्रावर लागवड, औषधे आणि इतर खर्च मिळून तीन लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे तीन महिन्यात नऊ लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे.
संकट तर प्रत्येकावर येत असतात पण संकटासमोर हार न मानता त्यातून मार्ग काढणाऱ्या व्यक्तीच्या पदरात यश पडतं हे पवार कुटुंबाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.
ADVERTISEMENT