यंग इंडियाचं कार्यालय बुधवारी सील करण्यात आलं. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही त्यांनी हवं ते करावं मी माझं काम करत राहणार अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधी यांनी यंग इंडियाचं ऑफिस सील केल्यानंतर नेमकं काय म्हटलं आहे?
काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात हेराल्ड हाऊस इमारतीतल्या यंग इंडियाच्या कार्यालय सील केलं आहे. या कारवाईबाबत राहुल गांधी यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी राहुल गांधी यांनी आपण नरेंद्र मोदींना घाबरत नसल्याचं म्हटलं आहे.
ईडीने मंगळवारी हेराल्ड हाऊसवर छापे टाकले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यंग इंडियाचं कार्यालयात सील करण्यात आलं. तसंच हे कार्यालय संमती न घेता उघडू नये असाही आदेश काढण्यात आला. हेराल्ड हाऊससह अकबर रोडवर असलेल्या सोनिया गांधी यांच्या दहा जनपथ निवासस्थान, तसंच शेजारी असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाभोवती पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. अकबर रोडच्या जवळ असलेल्या रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख आणि खासदार जयराम रमेश यांनी काँग्रेस मुख्यालयाला गराडा छावणीचं स्वरूप आल्याची टीका केली.
यंग इंडियाचं कार्यालय सील झाल्यानंतर राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका
“हा सगळा धमकावण्याचा प्रयत्न आहे. त्यांना वाटतं की थोडा दबाव टाकून हे गप्प बसतील. मात्र आम्ही गप्प बसणार नाही. या देशात लोकशाहीविरोधात नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे काही करत आहेत त्याविरोधात आम्ही उभे राहणार आहोत. त्यांनी काहीही केलं तरीही आम्ही ठामपणे उभे राहणार. आम्हाला काहीही फरक पडत नाही.” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
आम्ही घाबरणाऱ्यांमधले नाही, नरेंद्र मोदी यांना आम्ही घाबर नाही. देशाचं रक्षण करणं आणि देशाचं ऐक्य जपणं हे आमचं काम आहे ते आम्ही करत राहणार असं म्हणत राहुल गांधी यांनी थेट भाजपला आव्हान दिलं आहे.
नॅशनल हेराल्डशी संबंधित हेराल्ड हाऊससह १२ ठिकाणी ईडीचे छापे
नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी ईडीने हेराल्ड हाऊससह १२ ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, सोनिया गांधी यांना ईडीने प्रश्न विचारला होता की, एजेएलच्या अधिग्रहणात ९० कोटी रुपयांच्या कर्जाचा उल्लेख का नाही? तसेच डोटेक्स कंपनीने दिलेले १ कोटी रुपयांचे कर्ज कोणत्या स्वरूपात घेण्यात आले होते. या प्रश्नाला उत्तर देताना सोनिया गांधी यांनी सांगितलं होतं की, या सर्व गोष्टींची माहिती त्यांना नसून मोतीलाल व्होरा यांना आहे.
नॅशनल हेराल्डचं प्रकरण काय?
मार्च २००८ पर्यंत हे वृत्तपत्र सुरूवातीला देशातील स्वातंत्र्य लढ्याशी आणि त्यानंतर काँग्रेसशी संलग्न होते. १ एप्रिल २००८ मध्ये वृत्तपत्र बंद ठेवण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. हे वृत्तपत्र बंद करण्याच्या आधी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) कडून चालवलं जात होतं.
२००८ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेलं नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र कायमचं बंद करण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी २००९ मध्ये घेतला.
पुढे भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या कंपन्यातील अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. गांधी कुटुंबीयांकडून नॅशनल हेराल्डच्या (National Herald) संपत्तीत गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
१९३८ मध्ये काँग्रेस पक्षाने असोसिएट जर्नल्स लिमिटेड म्हणजेच AJL ची स्थापना केली होती. या अंतर्गत नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र काढण्यात आले. AJL वर ९० कोटींहून अधिक कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी आणखी एका कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीचं नाव होतं यंग इंडिया लिमिटेड (Young India Limited).
या कंपनीमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची ३८-३८ टक्के भागीदारी होती. एजेएलचे ९ कोटी शेअर्स यंग इंडियाला देण्यात आले होते. या बदल्यात यंग इंडिया एजेएलचे याचं देणं लागणार होता. या प्रकरणात देशातील मोक्याच्या जागा कंपनीला अतिशय कमी किमतींमध्ये देण्यात आल्या, असे आरोप आहेत.
मुंबई, दिल्ली या शहरांमधील मोक्याच्या ठिकाणी या जागा होत्या. त्यांचं भाडे AJL कंपनीला मिळत होतं. शिवाय जागांचं एकूण मूल्य २ हजार कोटींच्या घरात असू शकते, असा आरोप आहे. ज्या कंपनीकडे कोणताही व्यवसाय नाही, अशी कंपनी ५० लाखांच्या मोबदल्यात २ हजार कोटींची मालक बनल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT