२०२१ वर्षात कोरोनावरची लस बाजारात आल्यानंतर पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेवर येत असलेला ताण लक्षात घेता अर्थमंत्री निर्मला सीतारामन भरीव तरतूद करतील अशी आशा होती. सीतारामन यांनीही कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र ही लस सर्वसामान्यां मोफत मिळणार की यासाठी पैसे द्यावे लागतील याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT
एबीपी माझा वाहिनीच्या कार्यक्रमात भाजप आमदार आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी महाराष्ट्रात वर्षभराताल ९५ हजार कोटींची दारु संपते आणि लस मोफत पाहिजे हे आश्चर्याचं आहे असं वक्तव्य केलं आहे. “कोरोनाच्या लसीची किंमत किती असेल यावर अर्थसंकल्पात भाष्य करायची गरज नाही. त्याची विस्तृत घोषणा नंतर होईल. गरीबांना ही लस मोफत दिली जावी ही अपेक्षा सर्वांची आहे. पण उद्या शरद पवार किंवा अजित पवार यांना ही लस मोफत का द्यायची?? शरद पवार यांच्या ड्रायव्हरला जर किमान वेतनापेक्षा कमी पगार मिळत असेल तर त्याला नक्कीच लस मोफत मिळाली पाहिजे. महाराष्ट्रात एवढी ताकद आहे की आम्ही वर्षभरात ९५ हजार कोटीची दारु पिऊन टाकतो आणि लस मोफत पाहिजे हे आश्चर्याचं वाटतं.”
दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी भरघोस तरतूद करत निधीमध्ये वाढ केली आहे. सीतारामन यांनी आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेचा घोषणा करत यासाठी ६४ हजार १८० कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या निधीमध्ये १३७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सितारामन यांनी आपल्या भाषणात स्वच्छ भारत मिशनला आणखी पुढे राबवण्याची घोषणा केली आहे. भारताच्या शहरी भागांमधील अमृत योजनेसाठी २ लाख ८७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT