स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी आमच्या मनात नितांत आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याविषयी आम्हाला कुणीही शिकवायची गरज नाही. ज्या लोकांची मातृसंस्था स्वातंत्र्य लढ्यात सहभागीही झाली नव्हती त्यांनी आम्हाला वीर सावरकरांबाबत काहीही शिकवायाची गरज नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?
वीर सावरकरांचा अपमान झाल्यानंतर तो मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला याचा मला आनंद वाटतो. आदरणीय वीर सावरकर यांच्याबाबत आमच्या मनात अत्यंत आदर आणि श्रद्धा आहेच. ती कुणीही पुसायचं ठरवलं तरीही ती पुसता येणार नाही. स्वातंत्र्यवीराबाबत ते प्रश्न विचारत आहेत ज्यांच्या मातृसंस्थेच्या मुलांचा किंवा पिल्लांचा स्वातंत्र्यांशी काहीही संबंध नाही. स्वातंत्र्यवीरांबाबत असं प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे. RSS स्वातंत्र्य लढ्यापासून लांब होते. त्यामुळे त्यांनी याबाबत बोलू नये.
आम्ही एकत्र आलो आहोत कारण
स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला ते स्वातंत्र्यच आज धोक्यात आलं आहे. त्यातून बाहेर पडण्याच्या महत्त्वाच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे हा बाष्कळपणा त्यांनी बंद करावा आणि आधी स्वातंत्र्यलढ्यात आधी आपल्या मातृसंस्थेचं योगदान काय ते सांगावं. राहुल गांधी जे बोलले ते आम्हाला मान्य नाही. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य वेचलं ते स्वातंत्र्यच आज धोक्यात आलं आहे. तुम्ही ज्या मेहबुबा मुफ्तींसोबत पाट लावला होतात त्या भारतमाता की जय किंवा वंदे मातरम म्हणणार आहेत का? असा खोचक प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
हिंगोलीत वीर सावरकरांविषयी राहुल गांधी एवढं नीच वक्तव्य करतात. त्याच राहुल गांधींसोबत गळ्यात गळे घालून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात हे चित्र पाहून आमचं जाऊदे किमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील? असा प्रश्न मला पडतो. वीर सावरकरांचा जाज्वल्य अभिमान बाळासाहेब ठाकरेंना होता. त्यांचे विचार बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेले. मात्र आताचं चित्र पाहिलं तर वाईट वाटतं असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य केलं आहे.
शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा बाजार कुणी मांडू नये
आज बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे. अनेकांना दहा वर्षे लागली की शिवसेना प्रमुख काय होते ते समजायला. बाळासाहेब ठाकरेंचा विचार व्यक्त करण्यासाठी कृती असावी लागते. नाहीतर तो विचार राहात नाही. शिवसेना प्रमुखांबाबतचा बाजार कुणी मांडू नये असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळी लीन झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे उद्गार काढले आहेत.
शिवसेना प्रमुखांच्या आयुष्यावरचा जीवनपट आम्ही स्मारकात दाखवणार आहोत. स्मारकाचा ताबा राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी भाजपकडून होते आहे यावर प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की एक बघा भाजपला सगळ्याचाच ताबा हवा आहे. तो द्यायचा की नाही ते देशातल्या जनतेने ठरवायचं आहे. सगळंच लुटायचं हा भाजपचा मनसुबा आहे. मनात मांडे खाणं काही हरकत नाही तो लोकशाहीचा अधिकार आहे तो त्यांनी जरूर करावा.
ADVERTISEMENT