मुंबई: Constant Terrible Accidents in Hospitals: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) सतत मोठ्या दुर्घटना घडत आहेत आणि त्यात सामन्यांचा हकनाक जीव जातोय. प्रत्येक घटनेनंतर सरकारकडून (Maharashtra Govt) पीडितांना आर्थिक मदत जाहीर केली जाते, चौकशी करु अशी घोषणा होते… यानंतर आपण देखील सारं काही विसरुन जातो. मग पुन्हा एखादी दुर्घटना होते, परत सरकारकडून त्याच घोषणा होतात.
ADVERTISEMENT
गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात अनेक मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये फक्त हॉस्पिटलला (Hospitals) लागलेल्या आगी आणि वायूगळती याने तब्बल 55 निष्पाप लोकांचा जीव घेतला आहे. खरं तर आपला जीव वाचावा यासाठी रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये दाखल होत असतात. पण यावेळी रुग्णांना आजारपणानं नव्हे तर हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या दुर्घटनांनी जीव गमवावा लागत आहे.
महाराष्ट्रातील हॉस्पिटलमधील चार मोठ्या दुर्घटना:
1. भंडारा: (Bhandara Fire) या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भंडाऱ्यात एका शासकीय रुग्णलायत भीषण आग लागली होती. ज्यामध्ये तब्बल 10 चिमुकल्या बालकांना आपला जीव गमवावा लागला होता. शॉर्टसर्किटने लागलेल्या या आगीने हॉस्पिटलमधील 10 निष्पाप जीव घेतले होते. या अत्यंत धक्कादायक घटनेनंतर सरकारने तात्काळ सर्व रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे आदेश देखील दिले होते.
2. भांडूप: (Bhandup Fire) भंडाऱ्यातील घटनेला दोन महिने नाही लोटत तोच मुंबईतील भांडूप येथे बंद असणाऱ्या ड्रीम मॉलमधील असणाऱ्या सनराईज या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. 25 मार्च 2021 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. खरं तर कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून हे रुग्ण या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होतं. पण हॉस्पिटलला लागलेल्या आगीने त्यांना आपले प्राण गमवावे लागले.
Mumbai: भांडूपमधील सनराईज हॉस्पिटलला भीषण आग, 10 रुग्णांचा मृत्यू
3. नाशिक: (Nashik Oxygen leakage) 21 एप्रिल 2021 हा दिवस तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एका अर्थाने काळा दिवस ठरला. कारण केवळ ऑक्सिजनची गळती झाली आणि त्यामुळे हॉस्पिटलमधील तब्बल 22 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. ही घटना घडली ती नाशिकमधील डॉ. झाकीर हुसैन रूग्णालयात. रुग्णालयाच्या ऑक्सिजन टँकमध्ये रिफिलिंग करत असताना अचानक वायू गळती झाली. त्यामुळे रुग्णांना होणारा ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद पडला. यावेळी अनेक रुग्णांना केवळ ऑक्सिजनअभावी आपला जीव गमवावा लागला.
4. विरार: (Virar Fire) विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील एसीमध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. 23 एप्रिलला घडलेल्या या घटनेने राज्यातील सरकारच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण आगीची माहिती मिळताच अवघ्या तीन मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. मात्र, तरीही या आगीत 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले.
Nashik Oxygen Leak : प्रकरणी झाकीर हुसैन रूग्णालयाचं CCTV फुटेज आलं समोर
महाराष्ट्र सरकार करतंय तरी काय?
महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक अशा एक या भयंकर घटना घडतायेत. पण अशावेळी सरकारकडून फारसं काहीही घडताना दिसत नाही. राज्यातील जनता ही सरकारला मायबाप सरकार म्हणतं. पण सरकार जर सामान्यांना अशाप्रकारे वाऱ्यावर सोडणार असेल तर जनतेने त्यांच्यासमोर कोणत्या दृष्टीने पाहावं हाच प्रश्न आता अनेकांना पडू लागला आहे.
भंडाऱ्याच्या घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात यावे असे आदेश सरकारने दिले. पण त्याचं नेमकं काय झालं हे कोणालाच समजू शकलं नाही. त्यानंतर भांडूप आणि आता विरार येथे खासगी रुग्णालयांना लागलेल्या आगीने सरकारच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
खरं तर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडतात. ही गोष्ट आधीच लक्षात घेऊन सरकारने संबंधित यंत्रणांना तशा स्वरुपाची कारवाई करण्याचे आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं. मात्र, या पातळीवर सावळा गोंधळच असल्याचं दिसून आलं.
एकीकडे राज्यात कोरोनाने दररोज शेकडो लोकांचे प्राण जात आहेत. अशावेळी किमान दुर्घटना घडून किमान निष्पाप लोकांचे जीव जाणार नाहीत एवढी तरी सरकारने काळजी घेणं गरजेचं आहे. पण तसं काही होताना दिसत नाही म्हणून आज राज्यातील नागरिक विचारु लागलेत सरकार नेमकं करतंय तरी काय?
ADVERTISEMENT