महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांनी scheduled caste मध्ये आहे दाखवत नोकरीत आरक्षण मिळवलं, असा आरोप केला आहे, प्रत्यक्षात वानखेडे हे मुस्लिम आहेत, त्यामुळे त्यांना SC कोट्याचा लाभ घेता येणार नाही, असा दावाही मलिकांनी केलाय. पण खरोखर समीर वानखेडे मुस्लिम आहेत, तर त्याने काय फरक पडतो? मुस्लिममध्ये दलित नसतात का? दलित मुस्लिम असलेल्यांना नोकरीत आरक्षण मिळतं की नाही? हे समजून घ्या.
ADVERTISEMENT
1. मुस्लिमांमध्ये दलित असतात का?
भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, भारताचं संविधानही तेच सांगतं. संविधानातील मुलभूत अधिकारांमध्ये धर्माचं स्वातंत्र्य देण्यात आलंय. म्हणजेच एखादी व्यक्ती तिला हवा तो धर्म स्वीकारू शकते, हवा त्या धर्माचा प्रचार-प्रसार करू शकते. पण नवाब मलिक यांनी सांगितलंय की वानखेडेंच्या धर्माशी मला काही घेणं-देणं नाही पण त्यांनी चुकीच्या मार्गाने नोकरीत आरक्षण लाटण्यावर आक्षेप आहे.
शिक्षण आणि नोकरीत काही वर्गांसाठी आरक्षणाची तरतूद ही संविधानातच करण्यात आली आहे. सरकारी नोकरीत शेड्युल कास्ट म्हणजेच अनुसूचित जातींना 15 टक्के आरक्षण मिळतं. संविधानातील शेड्युल कास्ट ऑर्डर 1950 नुसार हे आरक्षण देण्यात येतं.
या ऑर्डरमध्ये अनेकदा बदल करण्यात आले, पण 1956 आणि 1990 मध्ये सगळ्यात महत्वाचा बदल झाला. या बदलानुसार हिंदू, शीख, बौद्ध या धर्मांव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्मातील व्यक्तीला शेड्युल कास्टमध्ये धरता येणार नाही.
या ऑर्डरमध्ये हे ही लिहिण्यात आलं होतं की मुस्लिमांमध्येही दलित असतात. या ऑर्डरनुसार असंही मानण्यात आलं की शेड्युल ट्राईब म्हणजेच अनुसूचित जमाती आणि OBC म्हणजेच इतर मागासवर्गात कोणत्याही धर्मातील व्यक्ती समाविष्ट होऊ शकते.
Sameer Wankhede : UPSC मध्ये जात प्रमाणपत्राची पडताळणी नेमकी कशी होते? समजून घ्या
2. मुस्लिमांना आरक्षण मिळतं का?
भारताच्या संविधानात धर्मानुसार कोणतंही आरक्षण देण्यात आलेलं नाही. पण काही राज्यांमध्ये आणि केंद्राच्या यादीतही मुस्लिमांमधील विशिष्ट वर्गाला सरकारी नोकरीत आरक्षण दिलं जातं. पण हे आरक्षण घेणाऱ्यांना मागासवर्गीय म्हणून गणलं जातं. उदाहरणार्थ बिहारमध्ये अन्सारी, मनसूरी, इद्रीस या मुस्लिम समाजातील वर्गाला OBC च्या कोट्यातून आरक्षण दिलं जातं.
मुस्लिम समाजातील व्यक्ती दलित किंवा शेड्युल कास्ट कोट्यातून आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. आणि याच नियमावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केलेत.
दलित मुस्लिम आणि दलित ख्रिश्चन समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ आणखी वाढवावा अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगानेही अशाचप्रकारची शिफारस 2008 मध्येच केली होती.
Nawab Malik vs Sameer Wankhede: समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे 26 हल्ले, क्रांती म्हणते…
3. दलित समाजातील व्यक्तीने जातीबाहेर लग्न केलं? धर्मांतर केलं, किंवा धर्मांतर करून पुन्हा दुसऱा धर्म स्वीकारला तर काय होतं?
शेड्युल कास्टमधून आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीला शेड्युल कास्टमध्ये जन्म झाल्याचा दाखला दाखवावा लागतो, असं शेड्युल कास्ट ऑर्डर 1950 मध्ये सांगण्यात आलंय. शेड्युल कास्टमधील व्यक्तीने जातीबाहेर लग्न जरी केलं, तरीही ती व्यक्ती SC कोट्यातून आरक्षणाचा लाभ घेऊ शकते.
आंतरजातीय विवाहातील आपत्याला आपल्या वडिलांचीच जात लागते. जर आई शेड्युल कास्टमधली असेल आणि वडील नसतील, आणि त्या मुला-मुलीची जात ही शेड्युल कास्टच हवी असेल, तर मूल हे आईच्याच संगोपनात वाढलंय, हे सिद्ध करावं लागतं.
हिंदू-शीख-बौद्ध धर्म एखाद्याने स्वीकारणं, किंवा आधी या धर्मातून दुसऱ्या धर्मात धर्मांतर केल्यानंतर पुन्हा हिंदू-शीख-बौद्ध धर्म स्वीकारल्यास SC कोट्याचा लाभ घेता येतो.
4. SC कोट्याचा कुणी गैरफायदा घेतला तर काय होतं?
जर एखाद्या व्यक्तीने SC कोट्यातून गैरमार्गाने आरक्षण लाटलं असेल, ते सिद्ध झालं, तर नोकरीतून काढून टाकलं जातं. सरकार त्या व्यक्तीविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करू शकतं, खटला सुरू होऊ शकतो. इतकंच नाही, तर त्याने त्याच्या जितकी वर्ष त्या नोकरीचा आरक्षणातून लाभ घेतला, तो पगारही त्या व्यक्तीकडून परत घेतला जाऊ शकतो.
ADVERTISEMENT