देशातलं सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुमला तिरुपती देवस्थानाची ओळख आहे. प्रत्येक वर्षी लाखो भाविक दर्शनासाठी इथे येत असतात. दानपेटीतून येणारं दान आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांमुळे हे देवस्थान नेहमी चर्चेत असतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या मिलींद नार्वेकर यांची तिरुपती देवस्थान समितीवर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
यानिमीत्ताने महाराष्ट्र आणि तिरुपती देवस्थानाचं एक नात पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. नवरात्र उत्सवात तिरुपती संस्थानाकडून कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी खास शालू पाठवण्यात येतो. याबाबत कोल्हापुरात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.
भारतामधलं सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपती संस्थानाची ओळख आहे. प्रत्येक वर्षी या मंदिर समितीवर नेमणूक करताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सर्व राज्यांमधून एक-एक व्यक्तीची निवड करतात. महाराष्ट्रातून आतापर्यंत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार, उद्योगपती अमोल काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ऋषी पांडे यांची तिरुपती संस्थानावर नेमणूक झाली आहे. यानंतर उद्धव ठाकरेंचे राईट हँड मानल्या जाणाऱ्या मिलींद नार्वेकरांच्या नेमणुकीमुळे हे संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
उद्धव ठाकरेंचे राईट हँड मिलींद नार्वेकर तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी
तिरुपती बालाजी आणि अंबाबाई यांच्यात आई-मुलाचं नातं आहे. कोल्हापुरात याविषयी अनेक आख्यायिका आहेत. यापैकी मान्यता असलेली कथा म्हणजे, एकदा भृगू ऋषी भगवान विष्णु ला भेटायला गेले होते. बराच वेळ हाक मारल्यानंतर ध्यानस्थ असलेल्या भगवान विष्णुंनी ऋषींच्या हाकेला ओ दिली नाही म्हणून ऋषी संतप्त झाले. संतप्त ऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. विष्णूच्या हृदयात लक्ष्मीचं स्थान असतं. त्यामुळे लक्ष्मी भगवान विष्णूंवर चिडली. ऋषींनी लाथ मारुनही तुम्ही काहीच बोलला नाहीत असं म्हणून रुसन बसलेली लक्ष्मी थेट आपल्या आईकडे म्हणजेच कोल्हापुरच्या आदिशक्ती जगतजननी महालक्ष्मी अंबाबाईकडे आली.
यानंतर भगवान विष्णू आपल्या पत्नीचा शोध घेत कोल्हापुरात आले असताना त्यांनी दहा वर्ष अंबाबाईची उपासना केली. यानंतर प्रसन्न झालेल्या अंबाबाईने विष्णूला सांगितलं की तू तिरुमला येथील सुवर्ण मुखरी नदीकडे जा आणि तपश्चर्या कर तिकडे तुला तुझी लक्ष्मी भेटेल. यानंतर तिरुपती बालाजी म्हणजेच विष्णूने अंबाबाईला नमस्कार केला आणि त्यांनी सुवर्ण मुखरी नदीच्या काठी तपश्चर्या केली. या तपश्चर्येनंतर विष्णू आणि लक्ष्मी यांची भेट झाली आणि हे ठीकाण तिरुपती बालाजी म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
अंबाबाई ही बालाजी आणि लक्ष्मी यांची माता, म्हणूनच कोल्हापुरात दरवर्षी नवरात्र उत्सवात तिरुपती संस्थानाकडून मानाचा शालू पाठवला जातो. एका मुलाने आपल्या आईला दिलेली भेट म्हणून ही प्रथा गेल्या ३० वर्षांपासून सुरु आहे. १९८५ सालपासून तिरुपती देवस्थान समितीकडून हा शालू कोल्हापुरच्या अंबाबाईला पाठवला जातो.
यानंतर लक्ष्मीने करवीर निवासीनी अंबाबाईकडे राहण्याचा निर्णय घेतला. तिरुपती बालाजी आणि पद्मावती देवीच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी स्वतः सूर्यनारायण अंबाबाईकडे येतात अशी मान्यता आहे. वर्षातून दोनवेळा कोल्हापुरात याचसाठी किरणोत्सव सोहळा साजरा केला जातो.
ADVERTISEMENT