गेल्या काही दिवसांत तुम्ही बातम्यांमध्ये डेल्टा वेरिएंटसंदर्भात खूप काही ऐकलं असेल….पण हा डेल्टा वेरिएंट नेमका आहे काय? कोरोनाचा या वेरिएंटने जगातल्या 70 हून अधिक देशांची डोकेदुखी का वाढवली आहे? डेल्टा वेरिएंटमुळे लसीकरण मोहीमेची किती आव्हानं वाढणार आहेत? डेल्टा वेरिएंटमुळे अनलॉकिंग लांबणीवर पडेल का? हेच आज समजून घेऊयात
ADVERTISEMENT
1. डेल्टा वेरिएंट नेमका आहे काय?
डेल्टा या वेरिएंटला B.1.617. असं आधी म्हणत होते, तो सगळ्यात पहिले भारतातच सापडला, त्यामुळे त्याला इंडियन वेरिएंट असंही म्हणत…पण कोणत्याही एका वेरिएंटला त्या देशाच्या नावाने ओळखलं जाऊ नये, असं म्हणत WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं वेरिएंटला वेगळी नावं ठेवली. त्यामुळे या वेरिएंटला डेल्टा वेरिएंट असं म्हणतात. या वेरिएंटला WHO ने Variant of concerns म्हणजेच चिंताजनक प्रकारात मोडणारा वेरिएंट असंही वर्गीकृत केलंय.
हा व्हायरस आला कुठून तर…दोन वेरिएंटमधून E484Q आणि L452R असे म्युटेशन झाले, आणि त्यातून नवा वेरिएंट तयार झाला, ज्याला आपण B.1.617 म्हणजेच डेल्टा वेरिएंट म्हणतो.
याचेच महाराष्ट्रात सँम्पल्सही मिळालेले. ऑक्टोबर 2020 मध्येच हा वेरिएंट सर्वप्रथम सापडलेला.
या वेरिएंटचे पुढे उपप्रकारही आले…भारतात कोरोनाची दुसरी लाट या डेल्टा वेरिएंटमुळेच आली, असंही मानलं जातं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा वेरिएंटमुळे 1 लाख 80 हजार मृत्यू झाले आहेत. इतकंच नाही तर या वेरिएंटमुळेच कुटुंबच्या कुटुंब कोरोनामुळे संक्रमित होत असल्याचंही म्हटलं जातं, जे की कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं.
भारतात जवळपास सर्वच राज्यांमध्ये हा व्हेरियंट सापडला आहे. पण खासकरुन या व्हेरियंटचा प्रभाव महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिसा आणि तेलंगणा राज्यांमध्ये सर्वाधिक आहे.
2. जगभरात काय आहे परिस्थिती?
डिसेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचा एक नवा वेरिएंट सापडला, ज्याला अल्फा वेरिएंट म्हणतात…हा वेरिएंट इतका धोकादायक होता की, ब्रिटनमध्ये 3 महिन्यांचा लॉकडाऊन लावण्याची नामुष्कीही ओढावली…पण त्यानंतर आता कुठे 21 जूनपासून ब्रिटन निर्बंधमुक्त होणार होतं, तोच डेल्टा वेरिएंटने ब्रिटनमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.
डेल्टा वेरिएंट ब्रिटनमध्ये सापडलेल्या अल्फा वेरिएंटपेक्षा 60 टक्के जास्त वेगाने संसर्ग करतो.
ब्रिटनमध्ये 2 जूनला 29 हजार 892 वर असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या आता डेल्टा वेरिएंटमुळे 42 हजार 323 वर पोहोचली आहे. ब्रिटन सरकारने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 90 टक्के डेल्टा वेरिएंटमुळेच आहे.
इतकंच नाही तर युकेप्रमाणेच अमेरिकेतही नव्या रुग्णांमध्ये 6 टक्के रुग्ण डेल्टा वेरिएंटमुळे वाढतायत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, झिंम्बाब्वे, श्रीलंकासारख्या देशांमध्येही डेल्टा वेरिएंट धुमाकूळ घालतोय…शिवाय जिथून कोरोनाचा उगम झाला, असं म्हटलं जातं, त्या चीनमध्येही 21 मे नंतर डेल्टा वेरिएंटमुळे 100 हून अधिक कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत.
समजून घ्या : कोरोना लसीचे ‘कॉकटेल’ डोस म्हणजे काय?
3. डेल्टा वेरिएंटवर लस किती प्रभावी?
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि एम्सने केलेल्या अभ्यासानुसार असं सांगण्यात आलंय की कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेऊन झाले असतील तरी डेल्टा वेरिएंटमुळे तुम्हाला कोरोनाचं पुन्हा संक्रमण होऊ शकतं. पण लसी डेल्टा वेरिएंटवर पूर्णत:च फेल आहेत, असं सिद्ध करणारा रिपोर्टही अजून समोर आलेला नाही.
पण भारत बायोटेकने मात्र कायम म्हटलंय, की कोवॅक्सीन ही कोरोनाच्या नव्या वेरिएंटवर सुद्धा प्रभावी आहे.
याशिवाय लान्सेटने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे की, डेल्टा वेरिएंटविरोधात फायझरसारखी लसही कमी प्रभावी ठरतेय. पण दोन्ही डोस घेऊन झाले असतील, तर कदाचित धोका कमी संभावू शकतो.
आता या डेल्टा वेरिएंटचेही म्युटेशन होऊ लागले आहेत. ज्याला डेल्टा प्लस किंवा AY.1 असं म्हणतात. डेल्टा प्लस म्युटेंटवर कोविड रुग्णांसाठी नव्याने आलेलं अँटीबॉडी कॉकटेलही काम करणार नाही, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
डेल्टा प्लस वेरिएंटचेही भारतात 7 जूनपर्यंत 6 रुग्ण सापडले आहेत.
अमेरिकेतील ब्राऊन पब्लिक हेल्थ युनिव्हर्सिटीचे डीन आशिष झा यांनीही या डेल्टा वेरिएंटवर चिंता व्यक्त करत म्हटलंय….केवळ भारतच नाही तर युके आणि अमेरिकेतही डेल्टा वेरिएंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण हेच डेल्टा वेरिएंटविरोधात मोठी ढाल ठरेल.
समजून घ्या : कोरोना लसीवर मोदी सरकार का आकारतंय GST?
भारतात दररोज वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या 4 लाखावरून 1 लाखाच्या आत घसरली आहे. पण महाराष्ट्रात मात्र अजूनही 10 हजाराच्या घरातच दररोज रुग्णसंख्या वाढतेय…त्यामुळे महाराष्ट्रातली कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात न येण्यामागेही डेल्टा वेरिएंट किंवा त्याचं होणारं म्युटेशन तर नाही ना? असा प्रश्न पडतोय.
ADVERTISEMENT