महाराष्ट्रात डेल्टा प्लस या नव्या वेरिएंटचे आतापर्यंत 21 रूग्ण मिळाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. भारतात या डेल्टा प्लस या नव्या वेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातच आहेत. डेल्टा प्लसच्या आधी भारतात डेल्टा वेरिएंट आलेला, ज्यामुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट आली. आता डेल्टा वेरिएंटचाच पुढचा वेरिएंट डेल्टा प्लसचेही रुग्ण आढळू लागल्याने कोरोनाची तिसरी लाट लवकर येतेय की काय अशीही चर्चा सुरू आहे? त्यामुळे हा डेल्टा प्लस वेरिएंट नेमका काय आहे तरी काय? डेल्टा पेक्षा डेल्टा प्लस किती वेगळा आहे? लस त्याच्यावर किती प्रभावी? त्याचा संसर्ग किती वेगाने होतोय? हेच आज समजून घेऊयात.
ADVERTISEMENT
डेल्टा वेरिएंट जास्त घातक आहे, महाराष्ट्रात त्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत, त्याच्यावर लस कमी प्रभावी आहे, रोगप्रतिकारशक्तीला तर हा वेरिएंट चकवाच देतो, असे अनेक महत्वाच्या गोष्टी या डेल्टा प्लस वेरिएंटसंदर्भातल्या तुम्ही जाणून घेणं महत्वाचं आहे.
सुरूवात करूयात डेल्टा वेरिएंट काय आहे?
B.1.617.2 याला डेल्टा वेरिएंट म्हणतात…तो भारतातच 2020 च्या ऑक्टोबरमध्ये सापडला. महाराष्ट्रातल्याच अमरावतीमधून तो सापडल्याचंही महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने म्हटलंय. पण who ने त्याचं नाव Delta असं ठेवलं.
दोन वेरिएंटमधून E484Q आणि L452R असे म्युटेशन झाले, आणि त्यातून डेल्टा वेरिएंट तयार झाला. आता याच डेल्टा वेरिएंटचं पुढे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस हा वेरिएंट तयार झाला आहे.
समजून घ्या : जगभरात धुमाकूळ घालणारा डेल्टा वेरिएंट नेमका आहे तरी काय?
हा डेल्टा प्लस वेरिएंट काय आहे ते ही समजून घ्या
तर डेल्टा प्लसमध्ये K417N हे म्युटेशन झालंय, जे दक्षिण आफ्रीका आणि ब्राझीलमध्ये मिळालेल्या बीटा आणि गामा या घातक वेरिएंटमध्ये होतं.
K417N म्युटेशन सार्स-कोव्हीड-२ च्या स्पाईक प्रोटीनमधील बदलाने झाले आहे. हे प्रथिन विषाणूला मानवी पेशीत शिरकाव करण्यासाठी मदत करते.
हा डेल्टा प्लस पहिले नेपाळमध्ये मिळाला, असं म्हटलं जातं. पण नेपाळमधील जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयाने ही शक्यता फेटाळली आहे. त्याच्यानंतर डेल्टा प्लस युरोपमध्ये मार्च महिन्यात मिळाल्याचंही म्हटलं जातंय.
डेल्टा प्लस वेरिएंटचे महाराष्ट्रात किती रुग्ण?
याचे भारतात रुग्ण आढळत तर आहेतच, पण आपण महाराष्ट्रातही या नव्या वेरिएंटचे 21 रुग्ण आढळले आहेत…ज्यात सर्वाधिक रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.
डेल्टा प्लस वेरिएंटचे 9 रुग्ण रत्नागिरीत, 7 रुग्ण जळगावमध्ये, 2 रुग्ण मुंबईत तर पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाण्यात प्रत्येकी 1 रुग्ण नोंदवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात 21 रुग्ण मिळाल्याने या रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री काय आहे? त्यांना आधीही कोविड होऊन गेलाय का, या गोष्टींचीही माहिती घेण्यात येतेय, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलेली आहे.
भारतात डेल्टा प्लस वेरिएंटचा पहिला रुग्ण मध्य प्रदेशात सापडलेला. हा रुग्ण कोरोनातून बराही झालेला आणि त्याचे लसीचे दोन्ही डोसही घेऊन झालेले.
याशिवाय केरळ राज्यातही डेल्टा प्लस वेरिएंटचे 3 रुग्ण आढळले आहेत.
Delta Plus: लस आणि प्रतिकारशक्ती या दोन्हीला चकमा देऊ शकतो कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट: तज्ज्ञ
आता मध्य प्रदेशच्या केसवरून तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की, लस घेतलेल्या माणसालाही डेल्टा प्लसमुळे कोरोना होत असेल, तर लस या वेरिएंटवर किती प्रभावी आहे?
तर डेल्टा प्लस वेरिएंट लस आणि रोगप्रतिकारशक्तीलाही चकवा देऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ज्यांनी आधीच लस घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या असतील, तर त्यालाही चकवा हा वेरिएंट चकवा देईल, असं CSIR इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीच्या अभ्यासकांनी म्हटलंय.
दुसरीकडे कोव्हिशिल्ड जिला बाहेरच्या देशांमध्ये अस्ट्राझेनेका लस म्हणून ओळखलं जातं, तीही डेल्टा वेरिएंटवर केवळ 60 टक्के प्रभावी असल्याचं तर पीफायझर लस 88 टक्के प्रभावी असल्याचं अभ्यासांमधून समोर आलेलं.
म्हणजेच या लसी त्यांच्या मूळ परिणामकारकतेपेक्षाही कमी परिणामकारता डेल्टा वेरिएंटवर दाखवतायत. त्यात डेल्टा प्लस वेरिएंटवर त्या किती प्रभावी असतील, हे आताच सांगणं कठीण आहे.
याशिवाय नव्याने तयार करण्यात आलेल मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल ट्रीटमेंटही डेल्टा प्लस वेरिएंटवर अपयशी ठरताना दिसते.
समजून घ्या : कोरोना लसीचे ‘कॉकटेल’ डोस म्हणजे काय?
जगात काय परिस्थिती आहे?
ब्रिटनमध्ये जून पर्यत 36 डेल्टा प्लस वेरिएंटच्या केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. यापैकी 18 जणांनी लस घेतलेलीच नव्हती. तर 2 जण असे होते, ज्यांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस उलटले होते, तरीही त्यांना डेल्टा प्लस वेरिएंटमुळे कोरोनाची लागण झाली. पण या वेरिएंटमुळे अजूनही तरी ब्रिटनमध्ये मृत्यूची नोंद झालेली नाही.
ब्रिटनसोबतच अमेरिका, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, चीन, नेपाळ, जपान आणि रशियामध्येही डेल्टा प्लस वेरिएंटच्या केसेस मिळाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
समजून घ्या : कोरोना लसीवर मोदी सरकार का आकारतंय GST?
हा डेल्टा प्लस वेरिएंट हळूहळू डोकं वर काढत असला तरी तो अजूनही वेरिएंट ऑफ कन्सर्न्स म्हणजेच चिंताजनक प्रकारात मोडणाऱ्या गटात टाकण्यात आलेला नाही. शिवाय हा वेरिएंट प्रचंड घातक आहे पण त्याचं संक्रमणाचं प्रमाण कमी आहे, अशी माहितीही महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.
कोरोनाची पहिली लाट असो वा दुसरी, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळतेय, हे आपण पहिल्यापासूनच पाहिलंय….त्यात आता हा नव्या वेरिएंटचेही महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अनलॉकिंग जरी होत असलं तरी डेल्टा प्लस वेरिएंट आणि तिसऱ्या लाटेचा धोका आपल्यालाच कदाचित जास्त असल्यामुळे आपण इतक्यात तरी निर्धास्त होऊन चालणार नाहीये.
ADVERTISEMENT