शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबईत सोमवारी झाली. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ही भेट नेमकी का झाली असावी? या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात का? अशीही चर्चाही सुरु झाली आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रात अशी राजकीय परंपरा राहिली आहे की, वैर हे राजकीय असावं वैयक्तिक नसावं. याच हेतूने देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतलेली असू शकते. पण या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान याबाबत संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा मंत्र दिला का? या प्रश्नाचंही उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. संजय राऊत यांनी दिलेलं हे उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT
सत्तेचा मंत्र दिला का?
ही भेट राजकीय होती असंही बोललं जातं आहे त्याबद्दल काय सांगाल? या भेटीत सत्तेचा मंत्र दिला असेल का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, ‘सत्तेचा मंत्र शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच दिला असेल महाराष्ट्रात विरोधी पक्ष ज्या प्रकारे गोंधळ निर्माण करतो आहे किंवा महाविकास आघाडी सरकारच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो आहे तसं त्यांनी केलं तर पुढची शंभर वर्षे त्यांची सत्ता येणार नाही. हे लक्षात ठेवा हा मंत्र शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच दिला असेल’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन लोटस विसरून जा.. ते महाराष्ट्रात होणार नाही आणि पश्चिम बंगालमध्येही होणार नाही. शरद पवारांची भेट यावरून ज्या काही चर्चा रंगल्या आहेत त्यांना काही अर्थ नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
काय म्हणाले संजय राऊत?
देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट झाली. शरद पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं असेल. राज्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका काय असली पाहिजे? राज्यातल्या विरोधी पक्षाने या महामारीच्या आणि कोरोनाच्या काळात नक्की कोणती पावलं उचलली पाहिजेत? महाविकास आघाडीला कोणत्या प्रकारचं सहकार्य विरोधी पक्षाने करणं गरजेचं आहे यासंदर्भात नक्कीच शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मार्गदर्शन केलं असेल. महाराष्ट्राला विरोधी पक्षाची एक मोठी परंपरा आहे. माननीय शरद पवार हेदेखील विरोधी पक्षनेते होते. त्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी राज्याच्या विधीमंडळात उत्तम काम केलं आहे. त्यामुळे फडणवीस यांना त्याच प्रकारे मार्गदर्शन हे शरद पवार यांनी केलं असेल.
शरद पवार यांची प्रकृती काहीशी बरी नव्हती. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही कऱण्यात आली. त्यानंतर ही एक सदिच्छा भेटही असू शकते. महाराष्ट्राला ही चांगली परंपरा आहे. आपण इतर राज्यांप्रमाणे ऱाजकीय शत्रुत्व घेऊन बसत नाही. जाणं येणं असतं आणि एकमेकांशी चर्चा होते. त्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणं योग्य नाही असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT