भाजपचा नेता जेव्हा नवाब मलिकांना कोर्टात भेटतो आणि नगरसेविकेचा संताप होतो…

विद्या

• 07:34 AM • 19 Apr 2022

भाजपचे सुमारे २० नेते मंडळी सोमवारी कोर्टात गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी सुनावणीसाठी नवाब मलिकही आले होते. पहिल्या नंबरची केस होती भाजप नेत्यांची. त्यानंतर नवाब मलिक यांची केस होती. नवाब मलिक यांना भाजपचा एक नेता भेटला. त्यानंतर एक नगरसेविका त्यांच्यावर चांगलीच भडकली. सोमवारी कोर्टात हा हाय व्होल्टेज ड्रामा झाला. नवाब मलिक यांची ED कोठडीतून आर्थर […]

Mumbaitak
follow google news

भाजपचे सुमारे २० नेते मंडळी सोमवारी कोर्टात गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी सुनावणीसाठी नवाब मलिकही आले होते. पहिल्या नंबरची केस होती भाजप नेत्यांची. त्यानंतर नवाब मलिक यांची केस होती. नवाब मलिक यांना भाजपचा एक नेता भेटला. त्यानंतर एक नगरसेविका त्यांच्यावर चांगलीच भडकली. सोमवारी कोर्टात हा हाय व्होल्टेज ड्रामा झाला.

हे वाचलं का?

नवाब मलिक यांची ED कोठडीतून आर्थर तुरुंगामध्ये रवानगी

काय घडलं कोर्टात?

सोमवारी भाजप नेत्यांचे बेस्ट बस कार्यालय आंदोलन प्रकरण सुरू असताना महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक कोर्टाबाहेर बसले होते. त्यावेळी अतुल शहा म्हणाले की मला माझ्या जुन्या मित्राला भेटायचे आहे आणि त्यानंतर ते नवाब मलिक यांना भेटले. ते परत येताच त्यांच्याच पक्षातल्या नगरसेविका शीतल गंभीर या अतुल शहा यांच्यावर चांगल्याच चिडल्या. नवाब मलिक नावाच्या राक्षसाला तुम्ही कसे काय भेटू शकता? असं म्हणत त्यांनी अतुल शहा यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की पोलिसांना हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा लागला. कोर्टाच्या आवारातच ही घटना घडल्याने सोमवारी कोर्टात हा विषय चांगलाच रंगला होता.

भाजप नेत्यांना कोर्टाने का झापलं?

भाजपच्या २० नेत्यांना मुंबईच्या विशेष कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. २०२० मधल्या एका प्रकरणावरून कोर्टाने मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची चांगलीच कानउघडणी केली. २३ जुलै २०२० ला ग्राहकांना बेस्टने मोठ्यामोठ्या रकमेची बिलं पाठवली होती. ती न भरल्याने वीज कापण्यात आली होती. याविरोधात आंदोलन करत भाजपचे २० नेते बेस्टच्या कार्यालयात शिरले होते. तिथे या भाजपच्या नेत्यांनी बॅनर्स लावले. घोषणाबाजी केली.

बेस्टच्या जनरल मॅनेजरना त्यांच्या कार्यालयात येण्यापासून भाजपच्या नेत्यांनी थांबवलं. तसंच पोलिसांनीही हुज्जत घातली असे सगळे आरोप भाजपच्या नेत्यांवर आहेत. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात FIR ही दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी ना हरकत दाखवल्यानंतर २०२१ मध्ये भाजपचा नेत्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. खासदार आणि आमदार यांच्यासंदर्भातल्या केसेसवर स्पेशल कोर्टात सुनावणी सुरू असताना भाजपचे अतुल शहा आणि काही मोजके नगरसेवक उपस्थित होते. मात्र २० जणांवर आरोप आहेत ते सगळेच अनुपस्थित राहिले. त्यामुळेच न्या. राहुल रोकडे म्हणाले की या केसवर हायकोर्ट लक्ष ठेवून आहे. प्रत्येक सुनावणीनंतर मला अहवाल द्यावा लागतो त्यामुळे या कोर्टात हजर राहणं आवश्यक आहे. एकीकडे हे सगळं भाजपच्या नेत्यांना कोर्टाने सुनावलं असतानाच अतुल शहा हे त्यांचे जुने मित्र नवाब मलिक यांना भेटले.

यानंतर भाजपच्या नगरसेविका गंभीर या अतुल शहा यांच्यावर चांगल्याच भडकल्या. तुम्ही नवाब मलिकांना कसे भेटू शकता? असंही त्यांनी विचारलं.

    follow whatsapp