मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो दसरा मेळावा घेतला त्या मेळाव्यात त्यांनी जयदेव ठाकरेंना आणलं होतं. जयदेव ठाकरे त्यांच्या घटस्फोटित पत्नी स्मिता ठाकरे आणि बिंदुमाधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरे हे सगळे एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी मेळाव्यातील दसरा मेळाव्यात दिसले. ठाकरे कुटुंबाचा आशीर्वादही आपल्यासोबत आहे हे एकनाथ शिंदे यांनी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अशात जयदेव ठाकरे एकनाथ शिंदे यांचा विचार आपल्याला पटतो. त्यामुळेच मी इथे आलो आहे. सगळं काही बरखास्त करून पुन्हा निवडणूक घ्या असंही भाष्य जयदेव ठाकरेंनी केलं. मात्र हे जयदेव ठाकरे नेमके आहेत तरी कोण? हे आपण जाणून घेऊ.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंच्या बंडाला बाळासाहेबांच्या पुत्राचा पाठिंबा, वाचा काय म्हणाले जयदेव ठाकरे?
एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात ठाकरे कुटुंबाची एंट्री झाली आणि त्यामुळे उद्धव ठाकरे एकटे पडले आहेत का? अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण ठाकरे कुटुंबातले सदस्यही शिंदे गटात गेल्याचं जायला मिळतंय. बाळासाहेब ठाकरेंची सावली बनून राहिलेला एक चेहरा होता तो म्हणजे थापा यांचा. काही दिवसांपूर्वी थापा यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. मात्र दसरा मेळाव्याच्या दिवशी जे चित्र दिसलं ते पाहून विविध चर्चा सुरू झाल्या. उद्धव ठाकरेंचे बंधू बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र जयदेव ठाकरे हे पहिल्यापासूनच काहीसे वादात राहिले आहेत.
जयदेव ठाकरे कोण आहेत?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना तीन मुलं होती. बिंदुमाधव ठाकरे ज्यांचं १९९६ मध्ये अपघाती निधन झालं. दुसरे पुत्र जयदेव ठाकरे त्यानंतर आहेत ते उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख आहेत. जयदेव ठाकरे हे त्यांच्या प्राणीप्रेमासाठीही ओळखले जातात. जयदेव हे जेव्हा मातोश्रीवर राहात होते तेव्हा त्यांनी साप, अजगर तसंच काही पक्षीही पाळले होते. मात्र जयदेव ठाकरे हे उद्धव ठाकरेंसारखे किंवा राज ठाकरेंसारखे राजकारणात कधीही सक्रिय नव्हते.
जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात उभा दावा कसा निर्माण झाला?
जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे सख्खे भाऊ. पण बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांच्यात उभा दावा निर्माण झाला तो संपत्तीवरून. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं मृत्यूपत्र तयार केलं होतं. २०१४ ला जो मालमत्ता आणि संपत्तीचा जो वाद होता तो थेट मुंबई हायकोर्टात गेला. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनुसार त्यांची संपत्ती १४.८५ कोटींची संपत्ती होती. उद्धव ठाकरेंनी तसं कोर्टात केलेल्या अर्जातही स्पष्ट केलं होतं. मात्र जयदेव ठाकरेंनी याच बाबीवर आक्षेप घेतला. त्यांनी असं म्हटलं होतं की एकट्या मातोश्रीची किंमत ४० कोटींच्या घरात आहे. तसंच सोबतच सामनाचं कार्यालय आणि शिवसेना भवन हे ठाकरे कुटुंबाच्या प्रॉपर्टीत समाविष्ट व्हावं ही मागणीही जयदेव ठाकरेंनी केली होती. दोन भावांमध्ये संपत्ती आणि मालमत्तेवरून झालेला हा उभा दावा महाराष्ट्राने पाहिला.
जयदेव ठाकरेंनी आणखी काय आक्षेप घेतला होता?
बाळासाहेब ठाकरेंनी मृत्यूपत्रात माझं नाव कसं लिहिलं नाही? या बाबीवर जयदेव ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. मी बाळासाहेब ठाकरेंना सोडून दुसरीकडे राहायला गेलो होतो तरीही बाळासाहेबांसोबत माझा संवाद होता. त्यामुळे त्यांनी माझं नाव मृत्यूपत्रात लिहिलं नाही ही बाब मला पटण्यासारखी नाही. असं म्हणत त्यांनी हा आक्षेप घेतला होता.
बाळासाहेब ठाकरेंचं मृत्यूपत्र नेमकं काय होतं?
बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्रानुसार मातोश्रीचा तळमजला शिवसेना या पक्षाच्या बैठका होण्यासाठी आणि पक्षाच्या कामासाठी
पहिला मजला स्मिता ठाकरेंचा मुलगा ऐश्वर्यच्या नावावर करण्यात आला
या मजल्याच्या मेंटेनन्सचा खर्च स्मिता ठाकरेंना द्यावा लागेल अशी बाब मृत्यूपत्रात नमूद होती.
उलटतपासणीच्या वेळी जयदेव ठाकरेंचं वादग्रस्त वक्तव्य
या सगळ्या प्रकरणात जेव्हा जयदेव ठाकरेंना ऐश्वर्यबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ऐश्वर्य हा आपला मुलगा नाही असं धक्कादायक वक्तव्य जयदेव ठाकरेंनी केलं होतं. यावरूनही खळबळ उडाली होती.
मृत्यूपत्रातला पुढचा उल्लेख काय?
मातोश्रीचा सर्वात वरचा मजला उद्धव ठाकरेंच्या नावावर
कर्जत आणि भंडारदारा येथील मालमत्ताही उद्धव ठाकरेंच्या नावावर
जयदेव ठाकरेंनी काय आक्षेप घेतला?
याच मुद्द्यावर जयदेव ठाकरेंनी आक्षेप घेतला होता की उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळी मालमत्ता कशी? बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती जेव्हा खूप ढासळलेली होती. सही करण्याच्या परिस्थितीतही जेव्हा बाळासाहेब नव्हते अशा वेळी हे मृत्यूपत्र तयार करण्यात आलं आहे असा गंभीर आरोप जयदेव ठाकरेंनी केला होता. तसंच त्यांनी असाही संशय व्यक्त केला होता की जे बाळासाहेब ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर आयुष्यभर लढले त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र इंग्रजी भाषेत कसं काय तयार केलं? कोर्टात या सगळ्या प्रकरणी सुनावण्या झाल्या. २०१८ मध्ये जयदेव ठाकरे यांनी संपत्तीबाबतची याचिका अचानक मागे घेतली आणि हा सगळा वाद तिथेच संपुष्टात आला. मात्र कोर्टात दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात जाताना महाराष्ट्राने पाहिलं.
जयदेव ठाकरे यांचं व्यक्तीगत आयुष्यही काहीसं वादग्रस्त
जयदेव ठाकरे यांनी ती लग्नं केली. त्यांच्या पहिल्या पत्नी जयश्री कालेलकर या होत्या. त्यांच्यासोबत जयदेव यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात स्मिता चित्रे आल्या. त्यांच्याशी लग्न केल्यानंतर त्या स्मिता ठाकरे झाल्या. त्यांच्यासोबतही पुढे मतभेद झाले आणि जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी आहेत अनुराधा ठाकरे. स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरेंमधला दुरावा हा चर्चेत आला होता. स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यातले खटके उडत होते. ते इतक्या प्रमाणात होते की मला बाळासाहेबांनीच कलीना या ठिकाणी जा असं सांगितलं.
जयदेव ठाकरे आणि राजकारणातल्या चर्चा
१९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी घोषणा जयदेव ठाकरेंनी केली होती. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली आणि मनसे स्थापन केली त्यावेळीही राज ठाकरेंसोबतच्या एका कार्यक्रमात ते दिसले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाच्या वेळी उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले पाहण्यास मिळाले. आता एकनाथ शिंदे यांच्या यांच्या मंचावर जयदेव ठाकरे दिसले आहेत. आम्हा ठाकरेंनी कुणी कुठल्या गोठ्यात बांधू शकत नाही असं वक्तव्य जयदेव ठाकरेंनी तेव्हाच केलं होतं. त्यामुळे जयदेव ठाकरे शिंदे गटात जातील याचीही शक्यता वाटत नाही. मात्र उद्धव ठाकरेंसोबतचा उभा दावा आणि बाळासाहेबांसोबत ताणले गेलेले संबंध यामुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत.
ADVERTISEMENT
